परभणी : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय चिंताजनक होत असताना आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने आंदोलनकर्ते शेतकरी अधिकच आक्रमक झालेत.
नवीन पिककर्जाच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. मात्र, उपोषणाला बसलेल्या एका शेतकऱ्याचा ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून हे शेतकरी आपल्या मागणीसाठी उपोषण करत आहेत.
आज तुकाराम वैजनाथ काळे या शेतकऱ्याला उपोषणस्थळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ मानवत येथे रुग्णालयात नेण्यात येत होते. यावेळी प्रवासातच त्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांचे प्रश्न राज्य सरकारकडून सोडविण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घेणार, असा संतप्त सवाल विचारलाय.