चंद्रावर प्लॉट घेणे पृथ्वीपेक्षा स्वस्त! पण घ्यावं की नाही? येथे वाचा सर्व

Buy Land On The Moon: चांद्रयान ३ चंद्राकडे झेपावले आहे. अशातच चंद्रावर जमीन खरेदी करता येऊ शकता येते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर जाणून घेऊया चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा नियम काय आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 8, 2023, 07:35 PM IST
चंद्रावर प्लॉट घेणे पृथ्वीपेक्षा स्वस्त! पण घ्यावं की नाही? येथे वाचा सर्व title=
How to buy Land on moon from india know legal process viral news in marathi

Land On The Moon: भारतासह संपूर्ण जगाच्या नजरा चांद्रयान-३कडे लागून राहिल्या आहेत. चांद्रयानने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. सर्वात महत्त्वाचा आणि खडतर टप्पा चांद्रयानाने पार केला आहे. २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. मिशन चांद्रयान-२ अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी पुन्हा एकदा चंद्रावर मानवाची वस्ती वसवू शकतो, अशा चर्चांना उधाण आलं आहे. काहीजण चंद्रावर जमीन खरेदी केल्याचा दावा करत आहेत. तर, काही कंपन्यांकडूनही चंद्रावर जमिन विक्री केली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात असं खरंच होऊ शकते का? चंद्रावर कोणाचा अधिकार आहे? हे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यात आहेत ना? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. 

चंद्रावर जमीन असावी असे अनेकांचे स्वप्न असू शकते. यापूर्वी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने चंद्रावर जमीन खरेदी केली होती. तर, किंग खान शाहरुख खान यांच्या ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या त्याच्या एका चाहत्याने चंद्रावर जमीन भेट म्हणून दिली होती. या व्यतिरिक्त चंद्रावर जमीन खरेदी करणाऱ्यांमध्ये अनेक दिग्गज व्यक्तींचीही नावे समोर आली आहेत. चंद्रावर जमीन विकत आहेत, असा दावा अनेक कंपन्या दावा करत आहेत. पण खरंच अशी जमीन खरेदी करता येऊ शकते का? 

मीडिया रिपोर्टनुसार,  Luna Society International आणि International Lunar Lands Registry या कंपन्यांच्या चंद्रावर जमीन विकण्याचा दावा करतात. या कंपन्यांच्या माध्यमातून 2002मध्ये हैदराबादच्या राजीव बेगडी आणि 2006मध्ये बेंगळुरुच्या ललित मेहता यांनी चंद्रावर प्लॉट खरेदी केला होता. https://lunarregistry.com वर ऑनलाइन जमीन खरेदी करु शकतात. तुम्ही चंद्राच्या बे ऑफ रेनबो, लेक ऑफ ड्रीम, सी ऑफ वाफर्स, सी ऑफ क्लाउड्स यासारख्या चंद्राच्या अनेक भागांची नावे येथे तुम्हाला दिसतील. यापैकी कोणत्याही एका ठिकाणी तुम्हाला जमीन खरेदी करण्याचा पर्याय दिला जातो. 

lunarregistry.comने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रावर एक एकर जमीन खरेदी करण्यासाठी USD 37.50 म्हणजेच भारतीय रुपयांनुसार 3075 रुपये इतके आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जमिनीचा भाव तर ठरवण्यात आला आहे मग चंद्राचा मालक कोण आहे आणि चंद्रावर नेमका हक्क कोणाचा? Outer Space Treaty 1967, चंद्रावर किंवा अंतराळातील कोणत्याही ग्रहावर कोण्या एका देशाचा किंवा व्यक्तीचा हक्क असू शकत नाही. चंद्रावर भले कोणत्याही देशाचा झेंडा फडकावत असो पण चंद्राचा मालक कोणी एक असू शकत नाही. 

हे ही वाचाः लेकीचा 18वा वाढदिवसाला हटके गिफ्ट; थेट चंद्रावर विकत घेतली जमीन

1967 मध्ये  104 देशांनी एक करार केला होता. विशेष म्हणजे भारतानेही या करारावर सही केली होती. त्याच्या नियमांनुसार यात चंद्र, तारे आणि अवकाशातील वस्तूंवर कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा देशाचा हक्क असू शकत नाही. त्यामुळं चंद्रावर जमीन खरेदी करता येते या दाव्यात काहीही तथ्य नाहीये. जर तुम्हालाही चंद्रावर जमीन घ्यायची इच्छा आहे तर लक्षात घ्या की याला कोणताही कायदेशीर आधार नाहीये. 

The Moon Exhibition Book

स्पेस लॉवर पुस्तकं लिहिणारे लेखक डॉ. जिल स्टुअर्ट यांनी त्यांच्या पुस्तकात The Moon Exhibition Bookमध्ये लिहलं आहे की, चंद्रावर जमिनी विकत घेणे आणि ती जमिन गिफ्ट करणे ही आजकाल फॅशन झाली आहे. कोणत्याही देशाचा चंद्रावर अधिकार नाहीये. पण या कंपन्या रजिस्ट्रर कशा करु शकतात? चंद्रावर जमीन विकण्याचा हा गोरखधंदा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे

हे लक्षात घ्या

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, कुठेही प्लॉट, जमीन किंवा मालमत्ता विकत घेण्यासाठी त्या गुंतवणुकीची सुरक्षा कोण करणार हा प्रश्न स्वतःलाच विचारा. Outer Space Treaty नुसार, कुठलाही देश चंद्रावर काय, तर अंतराळातील कुठल्याही गोष्टीवर मालकी हक्क गाजवू शकत नाही. हा नियम आणि कायदा माणसांना लागू होत नाही हे मान्यही करू. पण, तुम्ही चंद्रावर प्लॉट घेतल्यावर कोणत्या देशाची रजिस्ट्री असणार? देश नसला तर मग चंद्रावर वसाहत किंवा वेगळा समुदाय आहे का? ज्याची अथॉरिटी तुमच्या चंद्राच्या प्लॉटच्या रजिस्ट्रीवर असेल? त्याचे उत्तर ‘नाही’ असेच राहील. मग, चंद्रावर प्लॉट घेऊन पैसे वाया घालवायचे का याचा विचारही एकदा करा.