सांगली: हिंदू समाजातील लोकांमध्ये पूर्वीपासूनच एक कमजोरी आहे. त्यांना आपले आणि परके कोण हा भेद कळत नाही. देश, देव आणि धर्म हे हिंदू लोकांच्या रक्तातच नसते. सध्याच्या घडीला हिंदू समाज राष्ट्रवादाला मारक भूमिका घेत आहे, अशी टीका श्री शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी केली. ते मंगळवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
शौर्य दिनाच्या दिवशी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी
यावेळी संभाजी भिडे यांनी केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन केले. हा कायदा देशहिताचा आहे. हे पूर्वीच व्हायला पाहिजे होते. स्वातंत्र्याच्या नावाखाली या कायद्याला विरोध करणे योग्य नाही. हे अतिश्य घातक आहे. आतादेखील देशातील सुशिक्षित हिंदू लोकांनी या कायद्याविरोधात घेतलेली भूमिका ही राष्ट्रवादाला मारक आहे, असे संभाजी भिडे यांनी सांगितले.
यावेळी संभाजी भिडे यांनी मुस्लिम समाजाविषयीही आक्षेपार्ह वक्तव्य केले. मुसलमान या देशाचे नागरिक आहेत, असे आपण कितीही म्हटले तरी ते खरे नाही. ते राहतात इकडे आणि कौतुक इतराचे करतात. यासाठी मराठवाड्यात एक म्हण आहे. 'खायचं कणगीचं आणि गायच इरलीचं', अशी देशातील मुस्लिमांची तऱ्हा आहे. मुळात जिथे हिंदुंमध्ये राष्ट्रीयत्व नाही तर ते मुस्लिमांमध्ये कुठून येणार, असे भिडे यांनी म्हटले. यावेळी संभाजी भिडे यांनी ३० डिसेंबरला नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ सांगलीत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. तसेच या कायद्याविरोधी आंदोलन करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात. मात्र, तशी वेळ आली तर आम्ही रस्त्यावर येऊन समाजकंटकांना जशास तसे उत्तर देऊ, असेही भिडे यांनी सांगितले.