प्रणव पोळेकर, रत्नागिरी : जिल्ह्यात रात्रभर पडणारा पाऊस आणि पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने बिबट्याचे पिल्लू आणि मादीची ताटातूट झाली. मुसळधार पावसात कोठे आसरा मिळतो का, या शोधात चक्क बिबट्याच्या पिल्लाने घर गाठले. बिबट्याच्या पिल्लाला पाहताच ग्रामस्थांची आणि घरातील कुटुंबांची घाबरगुंडी उडाली. या बिबट्याच्या मागून त्याची आई असेल, या भितीच्या छायेखाली अख्खे कुटुंब होते. बिबट्याचे पिल्लू घरात घुसल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि पिल्लाला पाहण्यासाठी गर्दी झाली.
दरम्यान, बिबट्याचे पिल्लू घरात शिरल्याची माहिती वनअधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर या बिबट्याच्या पिल्लात ताब्यात घेण्यात आले. मेर्वी खर्डेवाडी येथील एका घरात बिबट्याच्या पिल्लाने प्रवेश केला. बिबट्याच्या पिल्लाला बघताच घरातील लोकांची खाबरगुंडी उडाली. बिबट्याचे पिल्लू घरात घुसल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली त्यामुळे पिल्लाला पाहण्यासाठी गर्दी झाली. तातडीने प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर आणि सिद्धेश पावसकर यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले.
त्यानंतर त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली. तातडीने वनपाल रवी गुरव, वनरक्षक महादेव पाटील, मिताली कुबल, विक्रम कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर या पिल्लाला जंगात सोडून देण्यात आले. परंतु विजेच्या प्रकाशाचा शोध घेत पिल्लू पुन्हा वस्तीत आले. या पिल्लाला सुरक्षित ठेवण्यात आले असून, रात्री जंगलात सुरक्षित ठिकाणी ठेवून मादीची वाट पाहणार असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले.