सांगलीतील शिराळ्यात जोरदार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, संपर्क तुटलेल्या गावांशी संपर्क साधण्यासाठी यंत्रणा काम करत आहे.

Updated: Jul 14, 2018, 10:00 AM IST
सांगलीतील शिराळ्यात जोरदार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला title=

सांगली: जिल्ह्यातील शिराळामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. गेले काही तास पावसाची संततधार कायम राहिल्याने वारणा नदीच्य़ा पाणीपातळीत वाढ झालीय. काखे-मांगले पूल पाण्याखाली गेलाय. तर अनेक गावांशी संपर्क तुटलाय. तसचं मांगले-सावर्डे बंधारा, कोकरूड-रेठरे येळापूर ओढ्यावरचे पूलही पाण्याखाली गेलेयत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, संपर्क तुटलेल्या गावांशी संपर्क साधण्यासाठी यंत्रणा काम करत आहे.

कोल्हापूरमध्येही पावसाची संततधार

दरम्यान, सांगलीच्या हद्दीला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्येही वाहतूक विस्कळीत झाली आहे.  जिल्हाभर कोसळत असलेला मुसळधार पाऊस. त्यामुळे धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि नदीपात्रातील पाणीपातळीत होणारी वाढ. यामुळे कोल्हापुरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळी ३८ फूट ४ इंचावर पोहोचली आहे. तर,  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील ६२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच, जिल्ह्यातील ५ राज्यमार्ग, १८ जिल्हामार्गही बंद झाले आहेत.

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गुजरातच्या वर असलेली चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम आहे. त्यामुळे रविवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान आज दुपारी १ वाजता समुद्राला मोठी भरती आहे. ही भरती मोसमातील सर्वात मोठी भरती असेल.. त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिलेत.