अलिबाग : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा दिसून येत आहे. पावसामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अंबा, सावित्री नद्यांनी बुधवारी सकाळी धोका पातळी ओलांडली, त्यामुळे नागोठणे आण महाड परिसरातील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली.
रोहा खिंडीत दरड कोसळल्याने नागोठणे रोहा दरम्यानची वाहतूक बंद झाली. ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने माणगाव पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. भोर घाटही बंद असल्याने दक्षिण रायगडमधून पुण्याला जोडणारे दोन्ही मार्ग बंद झाले. मरुड रोहा मार्गावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत आहे.
पाताळगंगा नदीने धोकापातळी ओलांडल्याने सावरोली येथील पूल पाण्याखाली गेला आहे. तर जांभूळपाडा पुल पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक थांबविण्यात आली. मोर्बा पूलावरून पुराचे पाणी गेल्याने माणगाव श्रीवर्धन वाहतूक रोखण्यात आली आहे.