कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कोकणकडे जाणारे मार्ग बंद

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. 

Updated: Aug 2, 2019, 07:24 PM IST
कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कोकणकडे जाणारे मार्ग बंद title=

कोल्हापूर : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. राजाराम बंधारा भागात पंचगंगेने ४३ फुटांची पातळी ओलांडली आहे. पाऊस अजूनही सुरूच आहे. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. यामुळे कोकणकडे जाणाऱ्या कोल्हापूर - गगनबावडा आणि कोल्हापूर - शाहूवाडी या दोन्ही महामार्गावरील रस्त्यावर पाणी आल्याने हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. 

दरम्यान, करवीर, बावडा, इचलकरंजी, कुरुंदवाड आणि नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत कोल्हापूर शहरातील सुतार मळा आणि इचलकरंजी शहरात नदीकाठी राहात असलेल्या काही भागातील कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 

मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक मार्गावर पाणी आल्यामुळे लोकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय. इतकेच नाही तर जिल्ह्यातील दूध संकलनावर पुराचा परिणाम झाला आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर सदृश्य परिस्थिती होऊ शकते.