मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना धोका; हवामान खात्याचा इशारा

गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. 

Updated: Sep 19, 2020, 11:34 AM IST
मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना धोका; हवामान खात्याचा इशारा title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: आगामी काही दिवसांत मुसळधार पावसामुळे राज्याच्या काही भागांतील खरीप पिकांचे नुकसान होण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. कुलाबा वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, नजीकच्या काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यासह दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार वृष्टी होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातही मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामुळे खरीप पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

मेळघाटातील नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकारांची गर्दी

गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.  अनेक भागांमध्ये नद्यांना पूर आल्याने मोठ्याप्रमाणावर शेतीचे नुकसान आणि वित्तहानी झाली आहे. औरंगाबादमध्ये तर गुरुवारी रात्री अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाला. यंदाच्या वर्षातील हा सर्वाधिक मुसळधार पाऊस मानला जात आहे. तर संपूर्ण मराठवाड्याचा विचार करता यंदा पावसाने सरासरी ओलांडली आहे. मराठवाड्यात सरासरीच्या १००.८ टक्के पाऊस झालाय. औरंगाबादेत यावर्षी १३७ टक्के पाऊस झालाय. मराठवाड्याची सरासरी ६७९ मिमी आहे. तर आत्तापर्यंत ५८५ मिमी पाऊस झाला. 

तर दुसरीकडे मुंबईत मात्र पावसाने ओढ दिल्याचे चित्र आहे. पावसाच्या तुरळक सरी वगळता शहरात फारसा पाऊस पडताना दिसत नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांमध्येही पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे तलावांतील पाणीसाठी पुन्हा कमी होण्यास सुरुवात झाली आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास मुंबईकरांना पुन्हा पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.