राज्यभरात परतीचा पाऊस

लातूर जिल्ह्यातील परतीच्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे.

Updated: Oct 22, 2019, 07:42 AM IST
राज्यभरात परतीचा पाऊस title=

मुंबई : राज्याभरात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लातूरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे लातूरकरांचे मोठ्या प्रमाणावर मोठा दिलासा मिळालाय. तर उस्मानाबादमध्ये काढणीला आलेली सोयाबीन पावसामुळे काळी पडू लागली आहेत. 

मुंबई
दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसानं काल रात्री मुंबईसह उपनगरांत पुन्हा हजेरी लावली.. मुंबईसह उपनगरांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या हा पाऊस पडतोय. 

लातूर 
शहराला पाणीपुरवठा करणारी मांजरा नदी पावसाळा संपला तरी कोरडी होती. शिवाय मांजरा धरणातही अत्यल्प पाणीसाठा होता. त्यामुळं यंदाही लातूरसाठी वॉटर ट्रेन मागवण्याची तयारी प्रशासनानं केली होती. पण रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा धरणाची पाणीपातळी वाढली. शिवाय गेली दोन ते तीन वर्ष कोरडी असलेली मांजरा नदी लगेचच प्रवाहित झाली. 

लातूरवरील रेल्वेने पाणी पुरवठ्याचे संकट तसेच नळाद्वारे बंद होणाऱ्या पाण्याचे संकट आता दूर झाले आहे. कारण गेल्या गेल्या दोन दिवसापासून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आणि बीड जिल्ह्यातील केज परिसरात तसेच धरण क्षेत्रात चांगला पाऊस झालाय. परिणामी मांजरा धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. धरणात रात्रीपर्यंत जवळपास १२ ते १३ एमएमक्यूब इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हे पाणी मृतसाठ्यातीलच आहे. दोन दिवसापूर्वी मांजरा धरणात फक्त ०४ ते साडेचार एमएमक्यूब इतकाच पाणीसाठा होता. 

लातूर जिल्ह्यातील परतीच्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तावरजा, मन्याड या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. निलंगा तालुक्यातील तेरणा नदीवरील राजेगाव, मदनसुरी, कोकळगाव, लिंबाळा, गुंजरगा येथील उच्चस्तरीय बंधारे काही मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तेरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

उस्मानाबाद
मागील तीन ते चार दिवसात पडत असलेल्या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात मतांच्या टक्केवारी परिणाम झालाच. त्याचबरोबर काढणीला आलेली सोयाबीन पावसामुळे काळी पडू लागलीये, यामुळे पिकांना  अपेक्षित हमी मिळणार नाही.. पावसानं इथल्या पिण्याच्या पाण्याचा जरी प्रश्न मिटला तरी शेतकऱ्यांनी उगवलेला सोयाबीन पाऊसमुळे खराब होत आहे. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात सोयाबीन हे पीक घेतले जाते, त्यामुळे अवेळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना पुन्हा भरपाईला सामोरं जावं लागणार आहे.

पुणे
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये  संध्याकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सोयाबीन आणि कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही मुसळधार पावसाने झोडपले.