पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या लातूरकरांना दिलासा

गेल्या काही दिवसांपासून लातूर शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाची हजेरी

Updated: Sep 27, 2019, 11:43 AM IST
पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या लातूरकरांना दिलासा title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर शहरात कमी पावसामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून लातूर शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. काल रात्रीच्या सुमारास लातूर शहरात १५ ते २० मिनिटे मुसळधार पावसाने हजेरी लावली.या जोरदार पावसामुळे औसा रोड भागातून पाणी रस्त्याने वाहत होते. दोन दिवसांपूर्वीही असाच जोरदार पाऊस लातूर आणि जिल्ह्याच्या काही भागात झाला होता. ज्यामुळे समाधान व्यक्त केलं जातं होतं. त्यातच काल रात्रीच्या या मुसळधार पावसामुळे आनंद व्यक्त केला जात आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील पावसाची सरासरी ही जवळपास ५०० मिमी पर्यंत गेली आहे. तर सर्वाधिक कमी पाऊस पडलेल्या लातूर तालुक्याची सरासरी ही ३०० मिमी च्या पुढे सरकली असून ती जवळपास ३५० मिमी इतकी झाली आहे. 

या पावसामुळे लातूरच्या पाणी पातळीत काही अंशी वाढ होण्याची आशा लातूरकरांना आहे. दरम्यान असाच पाऊस पुढील काही दिवस मांजरा धरण क्षेत्रात पडावा, जेणे करून लातूरकरांवरील तीव्र पाणी टंचाईचे ढग दूर होतील. तशी अपेक्षाही सर्वसामान्य लातूरकर व्यक्त करीत आहे.

यंदा पुरेसा पाऊस न पडल्यामुळे पाणीटंचाईचे सावट शहरावर आहे. त्यातच काल मध्यरात्रीपासून लातूर शहर आणि जिल्ह्यातील निलंगा शहरासह अनेक ठिकाणी दमदार पाऊस बरसला. लातूर जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार होऊन पिण्याच्या पाण्याचे संकट नेहमीच दूर होत असतं. असाच काहीसा पाऊस रात्री उशिरापर्यंत शहर आणि जिल्ह्यातील भागात बरसत होता. लातूर जिल्ह्याची पावसाची सरासरी ही ८०२ मिमी इतकी असून आतापर्यंत ५०० मिमीच्या वर पाऊस सरकलेला नाही. 

त्यात सर्वाधिक कमी पाऊस हा लातूर तालुक्यात ३०० मिमी पेक्षा कमी झाला आहे. बीड उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील मांजरा धरण क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे येत्या ०१ नोव्हेंबरपासून लातूर शहराला टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे.  त्यामुळे लातूर जिल्ह्यासह बीड-उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा धरण क्षेत्रात परतीच्या पावसाने दमदार एंट्री मारून लातूरचे पाणीसंकट दूर करावे अशी अपेक्षा लातूरकर नागरिक व्यक्त करीत आहेत.