लातूर : जिल्ह्यातील बहुतांश भागात काल रात्रीपासून परतीचा पाऊस जोरदार कोसळत आहेत. जिल्ह्यातील निलंगा, देवणी, जळकोट तालुक्यासह सर्वदूर हा परतीचा जोरदार पाऊस होता. यामुळे नदी-नाले-ओढे हे भरभरून वाहत होते. तर निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील उच्चस्तरीय बंधाऱ्याचे ५ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
निलंगा तालुक्यातील मांजरा-तेरणा नदीच्या संगमावरील वांजरखेडा येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या वरून पाणी वाहत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालंय. तर मांजरा-तेरणा नदी पात्रांच्या शेजारील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे लातूर शहरातही रात्रीपासूनच जोरदार पाऊस बरसत असल्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. रात्री १२ नंतर शहरातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा हा खंडित झाला होता. जो सकाळी उशिरापर्यंत सुरू झाला नव्हता.
दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी सुरू केली होती. मात्र परतीच्या जोरदार पावसामुळे सोयाबीन पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामूळे लातूर जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे बळीराजाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे ही दिसून येत आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्री वादळ तयार झालं असून हे वादळ कर्नाटक, तेलंगणा मार्गे लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यामार्गे महाराष्ट्रात धडकणार असल्यामुळे नागरिक आणि शेतकरी धास्तावले आहेत. तर प्रशासनानेही सतर्कतेचा ईशारा दिला आहे.