सूर्य आग ओकत होता, आणि शेतात शेतकरी घाम गाळत होता... पण अखेर तो कोसळला

मराठवाड्यात उष्णतेचा कहर, उस्मानाबाद जिल्ह्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू

Updated: Apr 1, 2022, 04:37 PM IST
सूर्य आग ओकत होता, आणि शेतात शेतकरी घाम गाळत होता... पण अखेर तो कोसळला   title=

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, उस्मानाबाद : गेल्या आठ दिवसापासून उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात उष्णतेचा पारा कमालीचा वाढला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या तापमानामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. उष्माघाताने (Heatstroke) एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे. कळंब तालुक्यातील हासेगाव इथल्या लिंबराज तुकाराम सुकाळे (वय 50) असं मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. 

उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू
लिंबराज सुकाळे हे आंदोरा गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे ते शेतात काम करण्यासाठी गेले. दुपारपर्यंत त्यांनी शेतात कामही केलं. दुपारनंतर हासेगाव इथल्या त्यांच्या घराच्या दुरुस्तीचं काम केलं. त्यानंतर ते गुरांना पाणी पाजण्यासाठी त्यांच्या गोठ्याकडे गेले पण त्याचवेळी त्यांना चक्कर आली आणि कोसळून जमिनीवर पडले. 

त्यांच्या मुलाला ही माहिती कळताच त्याने तात्काळ लिंबराज यांना कळंब उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलं. पण दवाखान्यात पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. रस्त्यातच लिंबराज यांचा मृत्यू झाला. दवाखान्यात पोहोचल्यावर डॉक्टरांनी लिंबराज यांना मृत घोषित केलं.

डॉक्टरांनी काय म्हटलं
लिंबराज सुकाळे यांना उपचारासाठी दवाखान्यात आणले त्यावेळी ते मृत होते. त्यानंतर केलेल्या शवविच्छेदनात त्यांच्या मृत्यू शरीरात पाणी व रक्ताची मात्रा कमी असल्याचे झाल्याचं समोर आले. त्यामुळे लिंबराज सुकाळे यांचा मृत्यू उष्माघाताने झाला आहे असं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम पाटील यांनी सांगितलं.

गेल्या आठवड्यापासून कमालीची उष्णता वाढली आहे त्यामुळे शेतकरी शेतमजूर आणि इतर सर्वांनीच उन्हामध्ये काम करणं टाळावं असं आवाहन  डॉक्टरांनी केले आहे .

मराठवाड्यातला पहिला बळी
लिंबराज सुकाळे यांचा झालेला मृत्यू मराठवाड्यातील उष्माघाताचा पहिला बळी ठरला आहे. यंदा राज्यात यापूर्वी जळगाव आणि अकोला या ठिकाणी उष्माघाताने दोघांचा जीव गेला आहे.