भुजबळांचे भाषण सुरू असताना मध्येच सुरू झाली हनुमान चालिसा, भाषण मध्येचं थांबवलं अन् म्हणाले, पोलिस इन्सपेक्टर...

Chhagan Bhujbal Hanuman Chalisa: छगन भुजबळ यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात भुजबळ यांचे भाषण सुरू असताना अचानक हनुमान चालीसा सुरू झाली. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 15, 2024, 12:37 PM IST
भुजबळांचे भाषण सुरू असताना मध्येच सुरू झाली हनुमान चालिसा, भाषण मध्येचं थांबवलं अन् म्हणाले, पोलिस इन्सपेक्टर...  title=
Hanuman Chalisa Video Maharashtra Minister Chhagan Bhujbal asks police to reduce volume of Hanuman Chalisa during his speech

Chhagan Bhujbal Hanuman Chalisa:  राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे भाषण करत असताना अचानक हनुमान चालिसा सुरू झाली. त्यावेळी भुजबळांनी भाषणात व्यत्यय आल्याने त्यांनी मंदिर प्रशासनाला आवाज कमी करण्याची विनंती केली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरुनच खासदार संजय राऊत यांनी भुजबळांना टोला लगावला आहे. 

नेमकं काय घडलं?

नाशिक- छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावरील पिंपळस ते येवला पर्यंत चौपदरी कॉंक्रिटीकरण रस्त्याचे तसेच चांदवड हद्दीतील लासलगाव विंचूर व म्हसोबा माता ते धारणगाव खेडला झुंगे या रस्त्याचे 694 कोटी रुपयांचे काँक्रिटीकरण भूमिपूजन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यावेळी भाषण सुरू असताना मध्येच हनुमान चालीसा सुरू झाली. तेव्हा भुजबळ यांनी मंदिर प्रशासनाला आवाज कमी करा, अशी विनंती केली. मी सुद्धा बजरंग बलीचा भक्त आहे बाबा, पण आवाजात भाषण कसे करणार? पोलिस इन्सपेक्टर तेवढी दखल घ्या, असंही भुजबळांनी म्हटलं आहे. नंतर भुजबळांनीच जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली, अशा घोषणाही त्यांनी दिल्या. 

भुजबळ काय म्हणाले?

 सुंदर असे दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधल्याने जेलमध्ये जावे लागले. पैसे दिले नाही तर भ्रष्टाचार कसला असे म्हणत कोर्टाने केस डिस्चार्ज केली. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात 2 हजार कोटी रुपयांचे काम सध्या सुरु आहे. या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी आलो आहे. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या पुणे गाव डोंगरगाव कालव्याला मांजरपाडा प्रकल्पाच्या अंतर्गत पाणी आणले. राजापूरची पाणीपुरवठा योजना सुरू आहे. तेथे काम पूर्ण झाले की तेथील नळाला पाणी येईल. लासलगाव 18 ते 20 कोटी रुपयांचं काम केलं आणि पाणी आले, असंही भुजबळांनी म्हटलं आहे. 

संजय राऊत काय म्हणाले?

हनुमान चालिसा प्रकरणावरुन संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. याच्यावरती अजित पवार साहेब यांनी बोललं पाहिजे त्यांचे जे नेते आहेत बॉस आहेत. हनुमान चालीसा ज्या बाई आहेत. अमरावतीतल्या त्या नाशिकला पोहोचल्या पाहिजे आणि भुजबळ फॉर्मवर त्यांनी हनुमान चालीसा वाचायला पाहिजे आहे. का आता तुमची हिम्मत कारण भुजबळ तुमच्या पक्षाशी संबंधित आहेत, असा टोला राऊतांनी लगावला आहे.