राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिकं गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच राज्यात काही ठिकाणी गारपिट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिट
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिट झाली. बारहाळी परिसराला वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झालं. सुमारे तासभर अवकाळी पावसाचा जोर होता. सुरुवातीला 15 ते 20 मिनिटे गारा पडल्या. गारांचा अक्षरश: खच पडला होता. शेतात कापून ठेवलेली तूर पीक भिजल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.
गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गव्हू, हरभरा आणि ज्वारीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी शेतकऱ्यांनी केली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विद्युत खांबही कोसळल्याने अजूनही काही भागात विद्युत पुरवठा खंडीत आहे.
बदलत्या वातावरणाचा हापूस आंब्याला फटका
अवकाळी पाऊस आणि बदलतं हवामान याचा फटका आंब्यालाही बसू लागला आहे. तीन दिवसांपुर्वी पडलेला अवकाळी पाऊस आणि पडणारी थंडी यामुळं आंबा पिक अडचणीत आलं आहे. 40 टक्के आंबा पिकाचं नुकसान झालं. थंडीमुळे पुनरमोहर होऊ लागल्यानं शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढू लागली आहे. ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सध्या आंब्याला फळधारणा होऊ लागलीय .या वातावरणामुळे फळगळती देखील होऊ शकते.