विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : जिल्ह्यातील आंबेजोगाई (Ambajogai), परळी शहर (Parali City) आणि परिसरात स्वराज्य जीआरबी घोटाळा (Swarajya GRB Scam) सध्या चांगलाच गाजतोय. 100 दिवसात दीड पट रक्कम मिळेल असं आमिष दाखवून अनेकांचे पैसे गोळा करण्यात आले. सुरुवातीला काही जणांना चांगला परतावा मिळाला. पण मोठी गुंतवणूक झाल्यानंतर ही कंपनी पैसे देत नसल्यामुळे ठेवीदारांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. रिटायर्ड लोकं, गृहिणी यासह अनेकांनी यामध्ये पैसा गुंतवलाय. मात्र या सर्वांची मोठी फसवणूक करण्यात आली. (GRB scam worth crores in Beed)
काय दिलं होतं आमिष?
स्वराज्य जीआरबी या कंपनीने शंभर दिवसांमध्ये परतावा दीडपट मिळत असल्याचं आमिष दाखवलं. या आमिषाला शेकडो लोकं भुलले. गणेश राजाराम भिसे हा कंपनीमध्ये संचालक भागीदार होता. सुरुवातीला या कंपनीने अनेक ठेवीदारांना चांगला परतावा दिला. हळुहळु गुंतवणूकदार वाढत गेले. करोडो रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. पण जशी गुंतवणूक वाढली, तशा गेल्या आठ महिन्यांपासून अनेक ठेवीदारांच्या मुदती संपून देखील परतावाच मिळाला नाही.
कष्टाचा पैसा गुंतवला
बीड जिल्ह्यात राहणारे निवृत्त शिक्षक मधु शिनगारे यांनी या कंपनीत सुरुवातीला तीन लाखाची गुंतवणूक केली. तीन लाखाच्या गुंतवणुकीनंतर शंभर दिवसांमध्ये त्यांना दीडपट परतावा मिळाला. यामुळे त्यांचा कंपनीवर विश्वास बसला आणि नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील पाच सदस्यांच्या नावावर जमा रक्कम दीडपट होईल या हेतूने जीआरबीमध्ये गुंतवली. त्यांना 32 लाख रुपयांचा परतावा मिळणार होता.
अशीच काहीशी गोष्ट आहे गृहिणी असलेल्या प्रतिभा म्हस्के यांची. प्रतिभा मस्के यांचे पती जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतात. आपलं घर चांगलं व्हावं या उद्देशाने त्यांनी देखील काही लाख रुपये या कंपनीमध्ये गुंतवले. गुंतवणूक केल्यानंतर सुरुलातील प्रतिभा म्हस्के यांना देखील चांगला परतावा मिळाला. परतावा मिळाल्यामुळे त्यांनी तब्बल 23 लाख रुपयांची गुंतवणूक केली. आपल्या घरातच स्वप्न पूर्ण होईल आणि उत्कृष्ट घर मिळेल या आशेने त्यांनीही गुंतवणूक केली.
पण मधु शिनगारे आणि प्रतिभा म्हस्के या दोघांनाही पैसे परत मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी सरकारकडे हस्तक्षेप करुन आपल्या मेहनतीचा पैसा परत मिळावा अशी विनंती केली आहे.
कोण आहे गणेश राजाराम भिसे पाटील?
जीआरबी म्हणजे गणेश राजाराम भिसे पाटील, हे मूळचे परळीचे रहिवासी असल्याची माहिती. गणेश राजाराम भिसे पाटील आणि त्यांच्या पत्नीने स्वराज्य नावाची कंपनी स्थापन केली. शेळीपालन, पोल्ट्री फार्मिंग, गोट फार्मिंग, बँकिंग प्लॉटिंग असे प्रोजेक्ट सुरू असल्याचा कंपनीने दावा केला आहे. सुरुवातीला शंभर दिवसांमध्ये दीडपट योजना सुरु केली. पण काही दिवसानंतर 120 दिवसाला दाम दीडपट योजनेच आणली, पुन्हा बदल करत 150 दिवस 200 दिवसाला दीडपट अशी योजना सुरु केली.
हजारो लोकांनी केली गुंतवणूक
मधु शिनगारे आणि प्रतिभा म्हस्के हे दोघंच नाही तर परळी,आंबेजोगाई शहर आणि परिसरातील अनेकांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे. अनेकांनी दागिने विकून, आपली शेती गहाण ठेवून पैसे गुंतवले आहेत. हा आकडा करोडो मध्ये असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 2000 हून अधिक लोकांनी यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. तक्रारीवरून गणेश राजाराम भिसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे धक्कादायक म्हणजे या कार्यालयाला टाळं लागलं असून कर्मचारीही या कार्यालयाकडे फिरकत नाहीत.