मुंबई: राज्याच्या १९ जिल्ह्यांमधील सुमारे १,५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सार्वत्रिक निवडणुकांची सोमवारी घोषणा झाली. त्यानुसार येत्या २९ मार्च रोजी ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल. तर ३० मार्चला निकाल जाहीर होतील. सर्व ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच महाविकासआघाडी सरकारने सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा काढलेला अध्यादेश राज्यपालांनी फेटाळून लावला होता. त्यामुळे या निवडणुकीत सरपंचपदासाठी थेट निवडणूक होईल.
एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी ६ ते १३ मार्च या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. १६ मार्चला या अर्जांची छाननी केली जाईल. तर १८ मार्च ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. यानंतर २९ मार्चला सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत मतदानप्रक्रिया पार पडेल. केवळ गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:-
ठाणे- १३, रायगड- १, रत्नागिरी- ८, नाशिक- १०२, जळगाव- २, अहमनगर- २, नंदुरबार- ३८, पुणे- ६, सातारा- २, कोल्हापूर- ४, औरंगाबाद- ७, नांदेड- १०० अमरावती- ५२६, अकोला- १, यवतमाळ- ४६१, बुलडाणा- १, नागपूर- १, वर्धा- ३ आणि गडचिरोली- २९६.