मुंबई : औरंगाबाद येथे आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मालगाडीने रेल्वे रुळावर झोपलेल्या १९ मजुरांना चिरडले. या दुर्घटनेत १६ मजूर जागीच ठार झाले आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर असून एक मजूर सुदैवाने वाचला आहे. जखमींवर औरंगाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. दरम्यान, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. गोयल यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
आज 5:22 AM पर नांदेड़ डिवीजन के बदनापुर व करमाड स्टेशन के बीच सोये हुए श्रमिकों के मालगाड़ी के नीचे आने का दुखद समाचार मिला।
राहत कार्य जारी है, व इन्क्वायरी के आदेश दिये गए हैं। दिवंगत आत्माओं की शांति हेतु ईश्वर से प्रार्थना करता हूँ। https://t.co/NnOmPNfATU
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 8, 2020
कोरोनाचे संकट आणि कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. त्यात खाण्याचे होणारे हाल असल्याने अनेक परप्रांतीय मजूर आपल्या गावी पायी परतत आहेत. जालना येथून भुसावळ असा पायी प्रवास करत हे मजूर मध्य प्रदेशमध्ये जात होते. त्यांनी रेल्वे रुळाचा मार्ग पकडत आपला प्रवास सुरु केला. दरम्यान, चालून थकल्याने या मजुरांनी झोपण्यासाठी रेल्वे पटरीचा आधार घेतला आणि हाच आधार त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले.
पहाटे गाढ झोपेत असताना मालगाडीने १९ मजुरांना चिरडले. यात १६ मजुरांचा मृत्यू झाला. हे मजूर जालन्यातील एका कंपनीत काम करत होते. हे मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते. औरंगाबाद येथून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडणार होते. मात्र, जालना ते औरंगाबाद रेल्वे रुळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. त्याचवेळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे येणाऱ्या मालगाडी खाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला. या प्रकणी रेल्वे मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी रेल्वे मंत्र्यांना स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.