जळगाव : वादळी वाऱ्याच्या पावसात जमीनदोस्त झालेल्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्गेरी गिरीश महाजन गेले होते. त्यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सेलचे अध्यक्ष सोपान पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. वादळामुळे रावेर तालुक्यात केळी उत्पादकाचं सुमारे १०० ते सव्वाशे कोटी रुपयांचं नुकसान झाले. असं असताना शासनाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा का केला नाही? अशी विचारणा सोपान पाटील यांनी केली.
गिरीश महाजन यांना विचारणा केल्यानंतर महाजन पाटील यांच्यावर चांगलेच भडकले. आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून नुकसानीची पाहणी करायला आलो आहोत. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्रीचं यायला पाहिजे अशी अपेक्षा चुकीचं असल्याच मंत्री महाजन म्हटले. तरीही सोपान पाटील हे काही केल्या ऐकत नसल्याचं पाहून महाजन यांनी त्यांना ढकलण्याचाही प्रयत्न केला. प्रकरण जरा हाताबाहेर जातंय हे पाहून यावेळी सोपान पाटील यांना एका शेतकऱ्यानं गर्दीतून ओढून बाहेर काढलं. या प्रकाराबाबत नंतर महाजन यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर बोलणं टाळलं.