गणपतींबरोबरच गौरींच्या मुखवट्यालाही परदेशात मागणी

गौरी-गणपती आता जवळपास पंधरा दिवसांवर आलेत. गणपतीबरोबरच गौरी मुखवटे तयार करण्याची लगबग सुरू आहे.

Updated: Aug 8, 2017, 11:27 PM IST
गणपतींबरोबरच गौरींच्या मुखवट्यालाही परदेशात मागणी  title=

सांगली : गौरी-गणपती आता जवळपास पंधरा दिवसांवर आलेत. गणपतीबरोबरच गौरी मुखवटे तयार करण्याची लगबग सुरू आहे. सांगलीतल्या एका कार्यशाळेतल्या गौरीच्या मुखवट्यांना परदेशातही मागणी आहे.

गणपतींबरोबरच गौरीच्या मुखवट्यांवरही शेवटचा हात फिरवला जातोय..... सांगतलीच्या अरविंद तोगरे यांच्या ओम आर्टस कार्यशाळेतही याचीच लगबग सुरू आहे. अरविंद तोगरे हे स्वतः एमए आणि जीडी आर्ट आहेत. त्यांचे वडील विजयकुमार तोगरे आणि सासरे विट्याचे दत्तात्रय बीडकर गणपती मूर्ती आणि गौरी मुखवटे तयार करायचे त्यामुळे गेली पन्नास वर्षं गौरी मुखवट्यांचा हा व्यवसाय सुरू आहे.  

साचा निर्मिती, मुखवटा घडवणे, फिनिशिंग, रंगकाम, दागदागिन्यांची कलाकुसर, डोळे, भुवया, नाक, ओठ यांचे नाजूक काम अशा अनेक टप्प्यांमधून हे मुखवटे आकाराला येतात. सजीव डोळे, धारदार नाक, नाजूक जिवणी आणि सुबक ठेवणे हे या मुखवट्यांचं वैशिष्ट्य.

वर्षभर गौरी मुखवटे तयार करण्याचं काम सुरु असतं. गौरीचे शाडूचे मुखवटे नाजूक असतात. त्यामुळे ते हातळताना अडचणी येतात. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे गौरी मुखवटे तयार केले जातात. एका गौरी मुखवटयाचं वजन १०० ग्रॅमच्या आसपास असतं. हे गौरी मुखवटे दरवर्षी विसर्जित केले जात नाहीत. त्यामुळे पर्यावरणाला फारशी हानी होत नाही.  

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, उस्मानाबाद. परळी वैजनाथ आणि पंढरपूर अशा भागांतून तोगरे यांच्या गौरी मुखवटयांना मोठी मागणी आहे. या ओम आर्टसचे हे मुखवटे अगदी सातासमुद्रापारही पोहोचलेत.

दागदागिने आणि आकार यांच्यात विविधता असलेले ८ ते ९ प्रकारचे गौरी मुखवटे इथे पाहायला मिळतात. त्यावरुनच त्यांचा दर ठरतो. आता पहिल्या टप्प्यात साधारणपणे दोन हजार गौरींचे मुखवटे तयार होऊन रवाना झालेत. तर दुस-या टप्प्यातल्या गौरींच्या मुखवट्याचं काम सध्या सुरू आहे.