Lalbaugcha Raja Visarjan: 74 वर्षांपूर्वी अशी होता 'लालबागचा राजा'ची मिरवणूक; जुन्या मुंबईतील गणेश विसर्जनाचा Video एकदा पाहाच

Lalbaugcha Raja: लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी 10 वाजताच सुरू झाली आहे. राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. याचदरम्यान एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 28, 2023, 02:53 PM IST
Lalbaugcha Raja Visarjan: 74 वर्षांपूर्वी अशी होता 'लालबागचा राजा'ची मिरवणूक; जुन्या मुंबईतील गणेश विसर्जनाचा Video एकदा पाहाच  title=
Ganpati Visarjan around 74 years ago in mumbai Scene of lalbaughcha raja in Netaji Subash Bose pose

Lalbaugcha Raja: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात आज लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले जाणार. 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देण्यात येईल. आजच्या दिवशी समस्त मुंबईकरांच्या नजरा या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीवर असतात. सकाळी 10च्या सुमारासच राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. पहाटेच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचेल. लालाबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. 74 वर्षांपूर्वी लालबागच्या राजाची मिरवणूक कशी होती याची सुरेख आठवण दाखवण्यात आली आहे. (Lalbaugcha Raja 2023 Visarjan)

दरवर्षी लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्यावर भक्तांची झुंबड उडते. राजाचे दर्शन घेण्यासाठी व राजाचे मुखदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात. मुंबई मॅटर्स या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यात 74 वर्षांपूर्वी बाप्पाची मिरवणूक कशी होती, हे दिसत आहे. या व्हिडिओत लालबागचा राजाची मूर्तीदेखील दिसत आहे. या व्हिडिओ पाहून अनेक मुंबईकर जुन्या आठवणी ताज्या करत आहेत. 

दक्षिण मुंबईतील हा विसर्जन सोहळा आहे. अनेक भाविक डोक्यावर बाप्पा घेऊन विसर्जनासाठी निघाले आहेत. सार्वजनिक मंडळाचे बाप्पाही मोठ्या बंदोबस्तासह विसर्जनासाठी निघाले आहेत. तर, बंदोबस्तासाठी आजूबाजूला पोलिसही दिसत आहेत. मोठ्या संख्येने भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी पोहोचले आहेत. डोक्यावर टोपी सदरा अन् धोतर असा पारंपारिक पोषाखात पुरुष दिसत आहेत. छत्री घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. 

या व्हायरल झालेल्या व्हिडिओत लालाबागच्या राजाचे दर्शनही होत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशात लालबागचा राजा दिसत आहे. फुलांनी सजवलेल्या गाडीत बाप्पाला घेऊन जात आहेत. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुक सुरू असतानाच हा व्हिडिओ समोर आल्याने मुंबईकर जुन्या आठवणीत रमले आहेत.