बाप्पांची मूर्ती आणि सजावट ऑनलाईन!

घरोघरी गणेशोत्सवाची लगबग आता सुरू झाली आहे.

Updated: Aug 6, 2017, 05:27 PM IST
बाप्पांची मूर्ती आणि सजावट ऑनलाईन!  title=

कपिल राऊत, प्रतिनिधी, झी मीडिया, ठाणे : घरोघरी गणेशोत्सवाची लगबग आता सुरू झाली आहे. मात्र मुंबईच्या धावपळीत मूर्ती निवडण्यापासून ते सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी वेळ मिळणं तसं कठीणच. ठाण्याच्या मोरया फाऊंडेशननं या समस्येवर ऑफलाईनच नव्हे, तर ऑनलाईन उपाय शोधलाय.

मोरया फाऊंडेशन गेल्या काही वर्षांपासून शाडूच्या मूर्तींचं प्रदर्शन भरवतंय. यंदाही मुलुंड पूर्वेकडे 90 फूट रस्त्यावर सेंटर पॉईंट टॉवर आणि ठाण्यात कापूरबावडीच्या कलाभवनात हे भव्य-दिव्य प्रदर्शन सुरू झालंय. विशेष म्हणजे, यंदा व्हॉट्सअॅपसोबत व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातूनही या प्रदर्शनामध्ये गणेशभक्तांना सहभागी होता येणार आहे.

शाडूच्या मातीपासून घडवलेल्या मूर्ती, इकोफ्रेंडली वस्तूंपासून तयार केलेली मखरं, आरास, मूर्तीची खड्यांच्या दागिन्यांनी सजावट आदी या प्रदर्शनामध्ये बघायला मिळतंय. श्रीकृष्णा शिवणे आणि शैलेश घोलप या 'एमबीए' झालेल्या जोडगोळीनं 'मोरया फाउंडेशन'ची दोन वर्षांपूर्वी स्थापना केली. यंदा त्यांना  जेजे स्कुल ऑफ आर्ट्सच्या विघ्नेश जांगळे आणि संकेत सुतार या उदयोन्मुख कलाकारांची साथ लाभलीये. या प्रदर्शानावर गणेशभक्त खूष आहेत.

गणेश चतुर्थीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत मुलुंड आणि ठाण्यातलं प्रदर्शन खुलं असेल. या प्रदर्शनात व्हिडिओ कॉलिंगद्वारे सहभागी व्हायचं असेल, तर ठाण्यासाठी ९८३३४३११४८ या क्रमांकावर तर मुलुंडसाठी ९७६९६७२३९४ या क्रमांकावर'व्हॉटसअॅप मेसेज' करून वेळ नोंदवावी लागेल.

संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत मोबाईलवर 'बाप्पा'चं प्रदर्शन 'लाईव्ह' पाहता येईल आणि मूर्तीसह अन्य साहित्याची नोंदणी करता येईल. गतवर्षीप्रमाणे व्हॉट्सअॅपवर फोटोच्या सहाय्यानं मूर्तीही पाहता येणार आहेत.