दारिद्र रेषेखालील कुटुंबांना मोफत लस, या नगरपालिकेचा मोठा निर्णय

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय

Updated: Jan 13, 2021, 01:16 PM IST
दारिद्र रेषेखालील कुटुंबांना मोफत लस, या नगरपालिकेचा मोठा निर्णय title=

नंदुरबार : राज्यात सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लस किती रुपयांना मिळते? यांची चर्चा सुरू असताना नंदुरबार शहरातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय नंदुरबार पालिकेने घेतला आहे. विशेष म्हणजे नंदुरबार पालिकेने अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद देखील यासाठी केली आहे. शहरात राहणाऱ्या  दारिद्य रेषेखालील नागरिकांची संख्या ३० हजार इतकी असून या नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरणाचा खर्च नंदुरबार पालिका उचलणार आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नंदुरबार महापालिका ही असं करणारी राज्यात पहिली पालिका असल्याचा दावा शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.

याआधी राज्यातील दारिद्य्ररेषेखालील नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. केंद्र सरकारकडे यासाठी आग्रह करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पण त्याआधी नंदुरबार पालिकेने निर्णय घेत बाजी मारली आहे.

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. सुरुवातीला ३ कोटी लोकांना मोफत लस दिली जाणार आहे. आरोग्य सेवेतील कर्मचारी,  फ्रंट लाईन कर्मचारी, दीर्घकालीन आजारी असलेले लोकं  यांना आधीही लस दिली जाणार आहे. 

सध्या देशात २ कंपन्यांची लस दिली जाणार आहे. कोरोना लसीकरणाचा ड्रायरन पूर्ण झाल्यानंतर आता लसीकरणाला केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. प्रत्यक्ष लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात होईल. 

याआधी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात मोफत लसीची घोषणा केली आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे याकडे राजकीय फायद्यासाठी म्हणून पाहिलं जात आहे. बिहार निवडणुकीतही कोरोना लसीचा मुद्दा आला होता.