राज्यातील पहिला कोट्यवधीचा भ्रष्टाचार खणून काढणारे पत्रकार जगतरावनाना सोनवणे यांचे निधन

व्यासंगी, साक्षेपी पत्रकार, अधिकारी आणि कर्मचारी मार्गदर्शक तसेच सेवा शर्तीविषयी ही त्यांची गाजलेली पुस्तके 

Updated: Aug 12, 2021, 06:48 PM IST
राज्यातील पहिला कोट्यवधीचा भ्रष्टाचार खणून काढणारे पत्रकार जगतरावनाना सोनवणे यांचे निधन title=

धुळे : धुळ्यातील दैनिक मतदार या वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक तसेच धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांचा भास्कर वाघ अपहार घोटाळा उघडकीस आणणारे आणि त्यासाठी पत्रपंदित पा.वा. गाडगीळ पुरस्कार मिळालेले, व्यासंगी, साक्षेपी पत्रकार, अधिकारी आणि कर्मचारी मार्गदर्शक तसेच सेवा शर्तीविषयी गाजलेली पुस्तके लिहणारे, सोनदिपा पब्लिशर्सचे सर्वेसर्वा, कायद्याचे अभ्यासक जगतरावनाना सोनवणे यांचे 12 ऑगस्ट रोजी, दुपारी साडेतीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. ( Jagatravnana Sonawane passes away, Dhule )

मरणोत्तर त्यांनी देहदानाची इच्छा प्रकट केली होती. मात्र, वैद्यकीय सल्ल्यानुसार, काही तांत्रिक बाबींमुळे ते शक्य होऊ शकले नाही. आता उद्या, बुधवारी, 13 ऑगस्ट रोजी, सकाळी 9 वाजता, देवापुरातील, एकविरा मंदिरजवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

जिल्हा परिषदेतील नोकरीवर पाणी सोडून नानांनी "मतदार" हे सर्वसामान्य जनता, शेतकरी व वंचित समाजासाठी वाहिलेले वृत्तपत्र सुरू केले. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून काम पाहताना प्रशासकीय पातळीवर अधिकारी व कर्मचारी यांना येणाऱ्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन त्यांनी सोनादिपा प्रकाशनाची स्थापना करून कर्मचारी व अधिकारी मार्गदर्शक ही अत्यंत गाजलेली पुस्तके निर्मित केली. राज्यातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, आस्थापना व न्याय संस्थेत ही पुस्तके संदर्भासाठी आजही वापरली जातात.

भास्कर वाघ प्रकरणात त्यांना गुंडांनी व राजकीय नेत्यांनी अतोनात त्रास दिला. तरीही नानांची लेखणी थांबली नाही. त्यांना व कुटुंबाला झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. त्यांनी खणून काढलेल्या या अपहार घोटाळ्याने तेव्हा सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्रातील हा पहिला कोट्यवधीचा घोटाळा. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कारभारात अनेक बदल करण्यात आले.