कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीला पाण्याचा वेढा

सांगलीत कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे, पाण्याने वेढा दिला आहे. 

Updated: Aug 7, 2019, 08:41 AM IST
कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीला पाण्याचा वेढा title=

सांगली : जिल्ह्यातील कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे, पाण्याने वेढा दिला आहे. गावात तीन हजार लोक  आणि ५०० गायी म्हशी अडकून पडल्या आहेत. नदीपात्रापासून बाहेर दीड किलोमीटरपर्यंत पाणी बाहेर येत असून, कृष्णा घाटावरील पूल पाण्याखाली गेला आहे. मिरज ते नृरसिंहवाडी मार्ग बंद झाला आहे. स्पीड बोटीच्या सहायाने महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी हे पूरग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिरगावमध्ये एनडीआरएफची टीमदेखील दाखल झाली असून लोकांना बाहेर काढण्याच काम सुरू आहे. 'झी २४ तास' वाहिनीने वृत्त प्रसारित करताच प्रशासनाने गंभीर दखल घेतली.

सांगली जवळ कृष्णा नदीची पाणी पातळी ५४ फूट दोन इंच इतकी वाढली आहे. सांगलीत आतापर्यंतची सर्वात ज्यास्त पाणी पातळीची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी, २००५ ला सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी ५३ फूट नऊ इंच इतकी होती तर कृष्णेने २००५ ची पाणी पातळी ओलांडली होती. सांगली महापुरामुळे जलमय झाली आहे. अर्ध्या सांगली शहरामध्ये पुराचं पाणी शिरले आहे. शामरावनगर, पत्रकार नगर, टिळक चौक, कोल्हापूर रस्ता, सांगलीवाडी या सह अनेक उपनगरा पुराचं पाणी शिरले आहे.

कोल्हापुरातही पूरस्थिती गंभीर 

दरम्यान, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक इथल्या पूरस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. नौदलाची सहा पथके राज्य सरकारने कोल्हापूरकडे मदतीसाठी रवाना केली आहेत. हवाई मार्गाने ही पथकं कोल्हापूरकडे झेपावली आहेत. सांगली जिल्ह्यात मदत कार्यासाठी चार एफआरपी बोट रवाना केल्या आहेत. एनडीआरएफचे हे पथक पुण्याहून सांगलीकडे आले आहे.  

एनडीआरएफची दोन पथके दाखल

पावसाचा जोर कायम असल्याने कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. पुरामुळे अनेक नागरिक अडकून पडलेत. त्यांना सोडवण्यासाठी बोटीचा वापर केला जातोय. हजारो नागरिकांना आत्तापर्यंत सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे अनेक भागात पुराचे पाणी शिरले आहे. कोल्हापुरातले जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कोल्हापुरातली कुंभार गल्ली, व्हिनस कॉर्नर जलमय झालंय. राष्ट्रीय महामार्ग चारवरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. महापुराच्या स्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची दोन पथके दाखल झाली आहेत.