सांगलीत पुरामुळे मुक्या जनावारांची दैना; तीन दिवसांपासून ५० जनावरे उपाशी

पुरात वाचलेल्या जनावरांना आंबेडकर नगर परिसरातील मैदानात ठेवण्यात आले आहे.

Updated: Aug 9, 2019, 07:45 AM IST
सांगलीत पुरामुळे मुक्या जनावारांची दैना; तीन दिवसांपासून ५० जनावरे उपाशी title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली: गेल्या चार दिवसांपासून दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती कायम आहे. याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) आणि अन्य यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत हजारो लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. 

मात्र, या सगळ्या गोंधळात मुक्या जनावरांना कोणीही वाली उरलेला नाही. पुराचे पाणी वाढल्यानंतर अनेकांनी आपल्या घरातील जनावरे मोकळी सोडून दिली होती. जेणेकरून त्यांना आपला जीव वाचवता येईल. पुराचे पाणी वाढल्यानंतर लोकांनी आपल्या गावातून स्थलांतर केले होते. मात्र, गायी-म्हशी याचठिकाणी राहिल्या होत्या. 

सध्या प्रशासकीय यंत्रणांकडून पुरात वाचलेल्या जनावरांना आंबेडकर नगर परिसरातील मैदानात ठेवण्यात आले आहे. मात्र, याठिकाणी चाऱ्याचा मोठ्याप्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून ५० जनावरे उपाशी असल्याचे समजते. 

 सांगलीवाडीतील ग्रामस्थ आयर्विन पुलावर अडकले

सांगलीवाडीमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी आयर्विन पुलावर सोडलेले १५० लोक आयुर्विन पुलावर अडकून पडले आहेत. या लोकांसाठी प्रशासनाकडून अन्नपाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. प्रशासनाने तत्काळ यंत्रणा न राबविल्यास विपरीत परिस्थिती निर्माण होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. 

आयर्विन पुलाजवळ सध्या पाण्याची पातळी जवळपास ५७ फूट इतकी आहे. त्यामुळे लोकांना पुलावरच आसरा घेण्यावाचून गत्यंतर नाही. दरम्यान, काही लोकांनी गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. तेव्हा त्यांनी नागरिकांना पुलावरच थांबण्याचे आदेश दिले. पाण्याची पातळी यापेक्षा जास्त वाढणार नाही. त्यादृष्टीने आमचे नियोजन सुरु आहे. आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत मदत पोहोचवू, असे आश्वासन अभिजित चौधरी यांनी नागरिकांना दिले. 

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारणची आणखी ३ पथके (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारणची २ पथकांना (SDRF) पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या प्रत्येक टीममध्ये ४ बोटी व २५ जवान असून एसडीआरएफच्या पथकात प्रत्येकी २ बोटी व २८ जवान आहेत. याशिवाय महाबळेश्वर येथून ५ बोटी तर करमाळ्यावरून ५ बोटी मागविण्यात आल्या आहेत.