सतीश मोहिते, झी २४ तास, नांदेड : कोंग्रेसचे माजी नगरसेवक तसंच 'नांदेडचे गोल्डमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले व्यापारी गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला. नांदेड शहरातील चौफाळा या भागात त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला.
सायंकाळी ६.०० वाजल्याच्या सुमारास गोविंद कोकुलवार हे आपल्या कार्यालयाजवळ दाखल झाले. यावेळी त्यांच्या पाळतीवर असलेल्या आणि पाठिमागून दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरानं त्यांच्या पाठीवर गोळी झाडली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला.
पाठीत गोळी लागल्यानं कोकुलवार गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रक्रृती गंभीर असल्याने कोकुलवार यांना मुंबईला हलवण्याची तयारी सुरु आहे.
दरम्यान या घटनेनंतर चौफाळा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी कोकुलवार यांना खंडणीसाठी धमकी आल्याचीदेखील माहिती आहे.
उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी शहरात दोन व्यापाऱ्यांवर गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये एखादी खंडणी वसुली करणारी गॅंग कार्यरत झाली आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.