अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : सहकारी कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रीरामपूर मधील सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांनी तृप्ती देसाई आणि त्यांच्या साथीदारांविरोधात विरोधात तक्रार दिलीय. संघटनेत सुरु असलेल्या गैरप्रकारांची वाच्यता केली म्हणून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मकासरे यांनी केलाय. तृप्ती देसाई यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
श्रीरामपूरमधील सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. मकासरे यांना चेहरा फुटेपर्यंत मारहाण करण्यात येत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. मारहाण कोण करतय? हे त्यात दिसत नसलं तरी आपल्याला तृप्ती देसाई तसेच त्यांचे पती प्रशांत देसाई यांच्यासह पाच जणांनी मारहाण केल्याची तक्रार मकासरे यांनी पोलिसांकडे केलीय.
विजय मकासरे हे मार्च २०१६ पासून तृप्ती देसाईंच्या संपर्कात आहेत. २७ जून रोजी मुंबईला जायचं असल्याचं सांगून त्यांना पुण्यात बोलावून घेण्यात आलं. त्यानंतर बालेवाडी परिसरात त्यांना गाडीत बसवून जबर मारहाण करण्यात आली. भूमाता ब्रिगेड ही संघटना बेकायदेशीर आहे, त्याचप्रमाणे तृप्ती देसाई लोकांना ब्लॅकमेल करतात याविषयी प्रश्न उपस्थित केले म्हणून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचं मकासरे यांनी म्हटलंय.
विजय मकासरे यांच्या तक्रारीवरून तृप्ती देसाईंच्या विरोधात पुण्यातील हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मारहाण करणं तसेच मोबाईल, सोनसाखळी अशा मौल्यवान वस्तू हिसकवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
तृप्ती देसाईंनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. मारहाण किंवा तसला कुठला प्रकार घडलाच नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. उलट विजय मकासरे यांच्यावरच त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे सगळं आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
तृप्ती देसाई या शनी शिंगणापूर आंदोलनापासून मागील दोन वर्षांत चर्चेत आलेल्या आहेत. मात्र त्यांचं काम आणि कार्यपद्धती नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. आता पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल त्यांच्यावर काय कारवाई होते, ते पाहावं लागेल.