Trending News Today: वसई किल्ला परिसरात गेल्या 25 दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात आले. वसईतील बिबट्याला पकडण्यात यश आल्यानंतर आता भाईंदरमध्येही बिबट्या मोकाट फिरत असल्याचे समोर आले आहे. एका घरात बिबट्या शिरल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंत, नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. (Leopard Found In Bhayandar)
भाईंदरच्या उत्तन परिसरात मागच्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचं बोलल जात आहे. रविवारी पहाटे केशव सृष्टी जवळ खाडी गाव येथे एका घरात बिबट्या शिरल्याचे सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाले आहे. परिसरात बिबट्या फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिक जीव मुठीत जगत आहेत.
मिरा भाईंदर शहरात उत्तन हा निसर्गरम्य परिसर आहे.शहराच्या एका बाजूला संजय गांधी उद्यान असून बिबट्या त्या जंगलातून आल्याचं बोललं जातं आहे.या अगोदर देखील उत्तन परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळाला आहे. तर एका बिबट्याला मागे पकडण्यात वन विभागाला यश आले होते.
मात्र, रविवारी मध्यरात्री स्थानिक नागरिकाच्या घराच्या मागच्या बाजूला बिबट्या शिकारीच्या शोधात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. यावर बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची महिती वनविभागाने दिली आहे. बिबट्या मोकाट फिरत असताना नागरिक मात्र जीव मुठीत घेऊन जगत आहेत. वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला पकडावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
Video: भाईंदरच्या उत्तन परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण pic.twitter.com/DrxuKZxXHa
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 25, 2024
दरम्यान वसईच्या किल्ला परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळले होते. बिबट्या किल्ल्यातील एका भुयारात असल्याचे वनविभागाने शोधून काढले होते. त्यानुसार, ट्रॅप आणि पिंजरा लावण्यात आला होता. मात्र, नागरिकांचा सतत वावर असल्यामुळं बिबट्या या भुयारातून बाहेरच येत नव्हता. अखेर वनविभागाने रो-रो फेरी आणि संध्याकाळी वसई किल्ल्यातील एक रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसांनी बिबट्याला पकडण्यास यश आले. मंगळवारी पहाटे 3.30 च्या दरम्यान वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले.