अमरावती : कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers in Delhi are protesting against the Agriculture Bill)सुरू आहे. यात राज्यमंत्री बच्चू कडू (BacchuKadu) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीन डिसेंबरपर्यंत दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर (Farmers' agitation) केंद्र सरकारने तोडगा काढावा अन्यथा दुचाकीने हजारो कार्यकर्ते घेऊन दिल्लीला जाऊ आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावे आणि त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची धग महाराष्ट्र राज्यात पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कृषी कायद्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालय इथं निदर्शनं केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. दिल्लीतील शेतकऱ्यांशी चर्चा करा आणि कृषी कायदे तात्काळ मागे घ्या अन्यथा राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी यावेळी दिला आहे.
तर दुसरीकडे केंद्र सरकारची दिल्लीत शेतकऱ्यांसोबत चर्चा सुरु आहे. ३२ शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी आहेत. सरकार शेतकऱ्यांना कृषी कायद्याची माहिती देणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांच्या नेतृत्वाखाली सरकार-शेतकरी संघटनांमध्ये चर्चा सुरु आहे. सरकारसोबतच्या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.