'चारा खा, पाणी प्या अन्‌ भुर्रकन उडून जा' अर्धा एकर शेत पक्ष्यांसाठी राखीव

मावळमधील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतातील ज्वारीचं उभं पीक पक्ष्यांसाठी राखीव ठेवलं आहे

Updated: Mar 11, 2022, 01:09 PM IST
'चारा खा, पाणी प्या अन्‌ भुर्रकन उडून जा' अर्धा एकर शेत पक्ष्यांसाठी राखीव title=

मावळ : शेतात पीक बहरू लागली की, पक्ष्यांचा थवा डौलदार पिकांवर येऊन ताव मारताना दिसतो.  हातातोंडाशी आलेली पिकं पक्षी नासधूस करु नये, म्हणून त्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतात बुजगावणं उभी केली जातात. पण मावळ तालुक्यातील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतातील ज्वारीचं उभं पीक पक्ष्यांसाठी राखीव ठेवलं आहे. 

मावळ तालुक्‍यातल्या चाकण इथला शेतकरी राजाराम गणपत लोंढे यांची 101 गुंठे शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात ज्वारी पिकाची लागवड केली. रात्रंदिवस दिवस शेतात काबाडकष्ट केल्या राजाराम लोंढे यांच्या शेतात ज्वारीचं दमदार पीक आलं आहे. 

अन्नपाण्याविना अनेकदा पक्षांचे हाल होतात. त्यामुळे नुकसानीची काळजी न करता राजाराम लोंढे यांनी 101 गुंठे शेतीपैकी 20 गुंठे शेती पक्ष्यांसाठी राखीव ठेवलं आहे. शेतीपासून चारही बाजूस सामान अंतरावर 20 मीटरवर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी झाडाखाली सोय केली आहे. यामुळे या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ पक्ष्यांचे थवे दिसत आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट कानावर ऐकू येतो.

इंदोरी-नानोली या रस्त्यावर लोंढे यांची शेती आहे. या परिसरातील बहुतांश शेतकरी हे ऊस शेती करतात. त्यामुळे आता पूर्वी प्रमाणे पक्ष्यांचे थवे पिकांवर घिरट्या घालताना दिसत नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी या परिसरात धान्य शेती केली आहे ते शेतकरी आपल्या धान्यांचे पक्ष्यांपासून संरक्षण होण्यासाठी शेतात ठाकर, कातकरी आदी समाजातील मजूर धान्य राखण्यासाठी कामाला ठेवतात. त्यामुळे या परिसरात पक्ष्यांच्या थव्यांचे दर्शन क्वचित होत होते. 

त्यातच वाढत्या उष्णतेचा फटका पशु-पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांचं विचार करत राजाराम लोंढे यांनी आपल्या शेतातील अर्धा एकरमधील ज्वारीचं पीक पक्ष्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना त्यांचा मुलगा ऋषीकेश लोंढे यांची देखील साथ मिळाली. 

लोंढे यांनी 101 गुंठे क्षेत्रात ज्वारीचे पीक घेतलं आहे. अंदाजे 10 ते 15 पोती याप्रमाणे त्यांना उत्पादन मिळणे अपेक्षित होते. पण, त्याकडे न पाहता आपल्या या क्षेत्रातील 20 गुंठे क्षेत्र कडक उन्हातही अन्न-पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या पक्ष्यांसाठी त्यांनी ठेवले आहे. त्यांच्या या निर्णयाचे त्यांच्या कुटुंबातून स्वागत होत आहे. तसेच त्यांच्या या उपक्रमाचे मावळ परिसरात कौतुक होत आहे