कोल्हापूर : चुकीच्या माहितीमुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची वेबसाईट वादाच्या भोव-यात सापडली आहे. या वेबसाईटवर दिशाभूल करणारा इतिहास प्रसिद्ध करण्यात आल्याने पर्यटकांसह इतिहास अभ्यासकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर म्हणजे राज्यातल्या शेकडो भाविकांचं श्रद्धास्थान. पण याच भाविकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आहे. तोही कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या kolhapur.gov.in वेबसाईटवरून..!
अंबाबाईची मूर्ती, जुना राजवाडा, पन्हाळ्याचा धडधडीत खोटा इतिहास या वेबसाईटवरून सांगण्यात आलाय. त्यामुळे कोल्हापूरला भेट देणारे पर्यटक आणि इतिहास अभ्यासकांमध्ये संतापाची लाट उसळलीय.
खरं तर इतिहास हा इतिहासच असतो त्यामध्ये नवसंशोधन पुढे येऊ शकतं. पण कोणताही आधार नसताना इतिहासाची चुकीच्या पद्धतीनं केलेली मांडणी सरकारी वेबसाईटवर प्रसिद्ध होणं ही दुर्दैवाची बाब आहे. जिल्हा प्रशासनानं हा खोटा मजकूर तात्काळ हटवावा आणि पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी हीच अपेक्षा.