पुण्यात चक्क बनावट एनए ऑर्डर, भोगवटापत्र तयार करून फ्लॅट्सचे रजिस्ट्रेशन

 Fake NA order in Pune : बातमी आहे 'झी 24 तास' इन्व्हेस्टीगेशनची. फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करताना मूळ दस्त तपासूनच रजिस्ट्रेशन केले जाते. मात्र पुण्यात चक्क बनावट एनए ऑर्डर आणि भोगवटापत्र तयार करून अनेक फ्लॅट्सचे रजिस्ट्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  

Updated: Mar 17, 2022, 06:28 PM IST
पुण्यात चक्क बनावट एनए ऑर्डर, भोगवटापत्र तयार करून फ्लॅट्सचे रजिस्ट्रेशन title=

सागर आव्हाड / पुणे : Fake NA order in Pune : बातमी आहे 'झी 24 तास' इन्व्हेस्टीगेशनची. फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करताना मूळ दस्त तपासूनच रजिस्ट्रेशन केले जाते. मात्र पुण्यात चक्क बनावट एनए ऑर्डर आणि भोगवटापत्र तयार करून अनेक फ्लॅट्सचे रजिस्ट्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दलाल आणि सरकारी बाबूंनी केलेल्या या बोगस दस्त नोंदणीचा भांडाफोड  'झी 24 तास'ने केला आहे. (Fake NA order, registration of flats by making occupancy certificate in Pune)

बनावट एनए ऑर्डर आणि बनावट भोगवटापत्र तयार करून शेकडो फ्लॅट्सची नोंदणी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची झोप उडालीय. (Pune Housing Society Scam ) अनधिकृत बांधकामातील फ्लॅट्सची नोंदणी गेल्या वर्षापासून पूर्णपर्ण बंद करण्यात आलीय. मात्र उपनगराच्या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं झाली आहेत.

अशा बांधकामातील दस्तांची नोंदणी बंद झाल्यामुळे काही हजार फ्लॅट्स पडून आहेत. एवढंच नाही तर अशा अनधिकृत बांधकामांमध्ये राजकीय क्षेत्रातील काही बड्या धेंडांचे पैसेही अडकून पडले आहेत. मात्र दलाल आणि सरकारी बाबूंनी यातून पळवाट काढत बनावट एनए ऑर्डर आणि बनावट भोगवटापत्राच्या आधारे अनेक फ्लॅट्सची दस्तनोंदणी करून घेतलीय.. विशेष म्हणजे यातल्या 67 बनावट एनए ऑर्डर्स एका बड्या IPS अधिका-याच्या नावानं आहेत. तर 37 बनावट भोगवटा पत्र महापालिकेच्या नावानं आहेत. 

घोटाळेबाजांचा प्रताप इथवरच थांबलेला नाही. त्यांनी चक्क विभागीय आयुक्त सौरभ राव आणि तत्कालीन नोंदणी महानिरीक्षक एस. चोक्कलिंगम यांना प्रांताधिकारी म्हणून दाखवत त्यांच्या खोट्या सह्या करून बनावट एनए ऑर्डर तयार केल्या. त्यानंतर दुय्यम निबंधकांना हातीशी धरत सदनिकांच्या नोंदणी करण्याचा सपाटा लावला. 

बोगस दस्तनोंदणीचा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आलीय. मात्र प्रशासकीय सेवेतील बड्या अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून या ऑर्डर तयार करण्यात आल्यामुळे प्रशासकीय पातळीवरदेखील कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

आतापर्यंत अशा बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून शंभराहून अधिक सदनिकांची दस्त नोंदणी झाल्याचं समोर येतंय. मात्र या प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात संशयास्पद दफ्तर तपासणीचे आदेश देण्यात आलेत. 

पुणे शहर आणि परसिरात अशा प्रकारे शेकडो फ्लॅट्सचं बोगस रजिस्ट्रेशन झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल विभाग पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहे. या बोगस दस्त नोंदणीतून सरकारी बाबू आणि दलालांनी चांगलाच मलिदा लाटलाय. आता या माफियांचा शोध घेऊन त्यांच्यावर काय कारवाई होते. हे पाहावं लागेल. मात्र  'झी 24 तास' इन्व्हेस्टीगेशन करून या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करतच राहणार आहे.