पुणे : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात फडणवीस-अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत. पुण्यातील बहु प्रतिक्षित तसेच बहुचर्चित भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेला होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच व्यासपीठावर हजेरी लावणार आहेत.
पुणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा सोहळा होणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला वेगळच महत्व आलंय. साधारणपणे वर्षभरापूर्वी या दोघांनी औटघटकेच्या मुख्यमंत्री उपमुख्मंत्रीपदाची शपथ घेतली होती. आता जाहीर कार्यक्रमात दोघांच्या एकत्र येण्याचा योग पुण्यात जुळून आला आहे.
या कार्यक्रमात उदघाटक म्हणून कुणाला बोलवायचं यावरून महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगल होतं. महापौरांनी त्यात मार्ग काढत दोघांनाही उदघाटनासाठी बोलावण्याचा निर्णय घेतला. आता ते दोघे याप्रसंगी काय टोलेबाजी करतात याविषयी उत्सुकता आहे.