आई घराबाहेर असताना चिमुकलीवर नराधमाचा डोळा; घरात घुसून केलं दुष्कर्म

राज्यात अनेक ठिकाणी मुली महिलांवर अत्याचाराच्या घटना कानावर आदळत असतानाच आता आणखी एका घटनेनं बुलढाणा जिल्हा हादरला आहे. 

Updated: Jun 9, 2022, 12:59 PM IST
आई घराबाहेर असताना चिमुकलीवर  नराधमाचा डोळा; घरात घुसून केलं दुष्कर्म title=

मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा : राज्यात अनेक ठिकाणी मुली महिलांवर अत्याचाराच्या घटना कानावर आदळत असतानाच आता आणखी एका घटनेनं बुलढाणा जिल्हा हादरला आहे. एक संतापदायक आणि समाजमन सुन्न करणारी  घटना बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.  खेळण्या-बागडण्याच्या वयात असलेल्या चिमुकलीला एका अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे.

रायपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावामध्ये  गावातीलच एका 45 वर्षीय इसमाने चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडलीये. या घटनेने संपूर्ण पंचक्रोशी हादरून गेली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे . फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून रायपूर पोलीस ठाण्यात पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

अशी झाली घटना 

 चिमुकलीची आई बुलढाणा येथे कामानिमित्त गेल्या असता त्यांची सात वर्षाची मुलगी घरी खेळत असताना, गावातीलच एका इसमाने त्या चिमुरडीला पकडुन  तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, आई घरी आल्यानंतर मुलीने हा प्रकार सांगितला, त्यावरून संतप्त झालेल्या गावातील नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले,  घटनेची तीव्रता पाहता पोलीस ठाण्यात बरेच गावकरी गोळा झाले होते, मात्र पोलिसांनी  तात्काळ आरोपीवर कारवाई करून अटक केली.