लक्झरी कारपेक्षाही महागडा, दीड टन वजनाच्या 'गजेंद्र'चा रुबाब

राहुरीच्या कृषी प्रदर्शनात महाकाय गजेंद्र ठरतोय आकर्षण

Updated: Apr 18, 2022, 05:54 PM IST
लक्झरी कारपेक्षाही महागडा, दीड टन वजनाच्या 'गजेंद्र'चा रुबाब title=

लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरच्या राहुरी इथं भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात एक कोटी रुपये किमत असलेला बेळगावचा दीड टन वजनाचा गजेंद्र नावाचा रेडा सगळ्याच्या आकर्षणाचं केंद्र झाला आहे. या रेड्याला पाहण्यासाठी राहुरी आणि पंचक्रोशीतील शेतकरी गर्दी करत आहेत.

सहा फूट उंच काळाभोर रंग आणि सुमारे दीड टन किलो वजन असलेलं डौलदार शरीर अशा वैशिष्ट्यांमुळे राहुरी इथल्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यां कडून गजेंद्रचं कौतुक होतं आहे. बेळगाव मधल्या विलास नाईक यांचा हा रेडा असून त्यांनी तो खास पंजाबमधून आणला आहे. पाच वर्षांचा असलेला गजेंद्र मुरा जातीचा आहे. 

त्याच्या देखरेखीसाठी तीन जण 24 तास कार्यरत आहेत. 15 लिटर दूध दोन किलो सफरचंद गव्हाची कणिक कडबा आणि वेगवेगळ्या प्रकारचा पशु आहार असा गजेंद्रचा रोजचा आहार आहे.

गजेंद्रला त्याचे मालक विलास नाईक वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनात आणि स्पर्धेत घेऊन जातात. कर्नाटकात कर्नाटक किंग तर महाराष्ट्र महाराष्ट्र चॅम्पियन अशी उपाधी गजेंद्रला मिळाली आहे. पंजाब हरियाणामध्ये गजेंद्रला आणखी चांगली किंमत मिळेल अस नाईक यांना वाटतं.