'बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून..'; मनोहर जोशींच्या निधनावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया

Manohar Joshi Death MNS Chief Raj Thackeray Paid Tribute: राज ठाकरे आणि मनोहर जोशी यांनी अनेक वर्ष शिवसेनेमध्ये एकत्र काम केलं आहे. राज ठाकरेंनी मनोहर जोशींच्या निधनानंतर भावनिक पोस्ट लिहून 'सरांना' अखेरचा निरोप दिला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 23, 2024, 10:05 AM IST
'बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून..'; मनोहर जोशींच्या निधनावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया title=
राज ठाकरेंनी सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या भावना

Manohar Joshi Death MNS Chief Raj Thackeray Paid Tribute: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज पहाटे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पहाटे 3 वाजता मनोहर जोशींचं निधन झालं. मनोहर जोशींच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही भावनिक पोस्ट लिहीत माजी मुख्यमंत्र्यांना अखेरचा निरोप देत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरेंनी बाळासाहेब आणि मनोहर जोशींच्या कनेक्शनसंदर्भातील उल्लेख आपल्या श्रद्धांजलीमध्ये केला आहे. "मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली," असं म्हणत राज ठाकरेंनी श्रद्धांजली वाहताना सुरुवातीलाच मनोहर जोशी हे बाळासाहेबांचे निकटवर्तीय होते याकडे लक्ष वेधलं आहे.

"शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले," असंही राज यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे.

नक्की वाचा >> पवार-ठाकरे मैत्रीमुळे मनोहर जोशी झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; 'त्या' सल्ल्यानं नशीब पालटलं

शिवसेनेचा धगधगता इतिहास...

"1966 पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली," असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटलंय.

नक्की वाचा >> 'सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या...', मनोहर जोशींच्या निधनाने गडकरी भावूक; हळहळून म्हणाले, 'कुटुंब...'

प्रदीर्घ राजकीय कारकिर्द

मनोहर जोशींना महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रेमाने 'जोशी सर' नावाने ओळखलं जायचं. याच नावाने राज ठाकरेंसहीत अगदी नितीन गडकरींनीही मनोहर जोशींना श्रद्धांली वाहताना उल्लेख केला आहे. मनोहर जोशी यांनी 1970 च्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

नक्की वाचा >> मनोहर जोशी म्हणालेले, 'राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात...'

1976 ते 1977 या काळात ते मुंबईचे महापौरही होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जोशी हे 4 वर्षे (1995-1999) शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते, जेव्हा पक्षाने भाजपासोबत युती करून महाराष्ट्रात सत्ता मिळवलेली. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात मनोहर जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष (2002-2004) म्हणून काम केले होते. जोशी हे मुंबई सेंट्रल मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी 6 वर्षे काम केले.