Mahadev app case: बॉलिवूड स्टार रणबीर कपूरला ईडीचे समन्स आले आहे. एका सट्टा अॅपची जाहिरात केल्याप्रकरणी रणबीरला समन्स बजावण्यात आलेत. आता याच प्रकरणी कॉमेडियन कपिल शर्मा याच्यासह अभिनेक्षी हुमा कुरेशी या दोघांना देखील ईडीचे समन्स आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. आता कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
महादेव ऑनलाईन सट्ट्याच्या अॅप प्रकरणी रणबीर कपूरनं ईडीकडे दोन आठवड्यांची वेळ मागितलीय. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला ईडीनं समन्स पाठवलंय. रणबीर कपूरला ६ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. महादेव अॅपप्रकरणी रणबीरची चौकशी करण्यात येणार आहे. महादेव अॅप हे ऑनलाईन सट्ट्याचं अॅप आहे. आणि या अॅपच्या जाहिरातीप्रकरणी यापूर्वीच अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आलेली आहे. याआधी सनी लिओनीसह, भाग्यश्री, टायगर श्रॉफ यांचीही चौकशी झालीय. आता रणबीरपर्यंत हे धागेदोरे गेले आहेत. आता रणबीर कपूरच्या मागणीवर ईडी काय उत्तर देतं, याकडे लक्ष लागलंय.
आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, भारती सिंग, एली अवराम, सनी लिओन, भाग्यश्री, पलकित सम्राट, कीर्ती खरबंदा, नुसरत भरूचा आणि कृष्णा असे अनेक सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत.
महादेव ऍप हे ऑनलाईन सट्ट्याचं ऍप आहे आणि या ऍपच्या जाहिरातीमुळे रणबीरसह अनेक स्टार्स ईडीच्या निशाण्यावर आले आहेत. फेब्रुवारीमध्ये यूएईमधल्या अलिशान हॉटेलात ऑनलाईन सट्टा ऍपप्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरचा लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे रणबीरसह अनेक कलाकार ईडीच्या रडारवर आलेत. त्यामुळे हे प्रकरण केवळ ऑनलाईन सट्ट्यापुरतं मर्यादित नाही असा संशय ईडीला आहे.