पर्यावरणपूरक गहू आणि बांबूच्या स्ट्रॉमुळे आदीवासिंना रोजगार

नागपूरच्या श्रेयस नंदनवार या तरुणाने गहू आणि बांबूपासून स्ट्रॉ तयार केले आहेत. 

Updated: Jun 4, 2019, 07:24 PM IST
पर्यावरणपूरक गहू आणि बांबूच्या स्ट्रॉमुळे आदीवासिंना रोजगार  title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आली असली तरी प्लास्टिकचा वापर होताना दिसतो.  नारळपाणी किंवा शीतपेये पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या स्ट्रॉचा वापर केला जातो. पण आता यावरही पर्याय उपलब्ध झाला आहे. लिंबू पाणी, विविध ज्यूस, नारळपाणी पिण्यासाठी प्लास्टिक स्ट्रॉचा वापर करण्यात येतो. प्लस्टिकचे स्ट्रॉ पर्यावरणपूरक नसून हे स्ट्रॉ नष्ट होत नाहीत. या प्लास्टिक स्ट्रॉ ऐवजी आता बांबू आणि गव्हाच्या दांड्यापासून तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉचा देखील वापर करता येऊ शकतो. नागपूरच्या श्रेयस नंदनवार या तरुणाने गहू आणि बांबूपासून स्ट्रॉ तयार केले आहेत. 

श्रेयस नंदनवार हा नागपूरचा तरुण आर्किटेकमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर गुजरातच्या अहमदाबादला ग्रामीण व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षणासाठी गेला होता. महाविद्यालयाच्या स्टडी टूरवर व्हियेतनाम ला गेल्यावर तिथे त्याला  कॉफी व इतर पेय पिण्यासाठी बांबूच्या स्ट्रॉचा वापर होत असल्याचे त्याचा निदर्शनात आले... भारतात परतल्यावर त्याने प्लास्टिकचा विषय शोध प्रबंधासाठी निवडला... शोध प्रबंध सादर केल्यावर शांत न बसता बांबूचे स्ट्रॉ तयार करता येतील याकडे लक्ष केंद्रित केले... सोबतच गव्हाचे पीक घेतल्यावर अनुत्पादक भागापासून (गव्हाचे धांडे) स्ट्रॉ करण्याचे तंत्र विकसित केले.

ठळक मुद्दे 

एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या खाद्य पदार्थाच्या आउटलेटमध्ये दर महिन्याला २८ हजार स्ट्रॉचा वापर
अहमदाबादमध्ये या कंपनीचे १३ आउटलेट आहेत 
त्यात दर महिन्याला ३ लाख ६४ हजार व वर्षाला ४३ लाख ६८ हजार स्ट्रॉचा वापर 
एकट्या गुजरातमध्ये या कंपनीचे ४० आउटलेट आहेत,ज्यामुळे वर्षाला १ कोटी ३४ लाख ४० हजार एवढ्या प्रचंड प्रमाणात प्लास्टिक स्ट्रॉचा वापर 

बांबू आणि गव्हापासून तयार करण्यात येत असलेले हे स्ट्रॉ प्लास्टिक स्ट्रॉच्या तुलनेत थोडे महाग असले तरी हे पर्यावरणपूरक आहेत. उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरु झाले की याच्या किंमतीही कमी होतील असा विश्वास श्रेयसला आहे. ईशान्य भारतातील त्याच्या मित्रांच्या मदतीने या स्ट्रॉचे त्याने उत्पादन सुरु केले आहे. या स्ट्रॉचा त्याने सोशल मीडियावरून प्रचार केल्यावर त्याला अहमदाबाद येथील ३ आमि फरिदाबाद येथील एका रेस्टारंट कडून मागणी देखील आली आहे. गहू शेतातून काढलं की गहू पिकाचा उरलेला भाग शेतकरी जाळून देतात. याच दांड्यांचा वापर स्ट्रॉसाठी केल्यास शेतकऱ्यांचा देखील आर्थिक फायदा होईल तसेच आदिवासी भागातील बांबूचा वापर स्ट्रॉ साठी केल्यास आदिवासींनाही याचा फायदा नक्की होणार आहे. यासाठी शासनाने काही मदत करावी अशी मागणी श्रेयसची आई डॉ. दीप्ती नंदनवार यांनी केली आहे. 

गहू आणि बांबू पासून तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉचे पेटंट घेण्याचा श्रेयसचा विचार आहे... काहीतरी सामाजिक कार्य हातून घडावे व शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी हा प्रयत्न केल्याचे श्रेयस सांगतो. सरकारने मदत केल्यास मोठ्या प्रमाणात वापर होणाऱ्या प्लास्टिक स्ट्रॉपासून होणाऱ्या नुकसानातून नागरिकांची सुटका होईल असाही विश्वास श्रेयसला आहे.