सतत अवकाळीचे संकट; नाशिकच्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी निवडला वेगळा पर्याय

Farmers News In Maharashtra: सतत अवकाळीचे संकट, पिकाला मिळणारा कमी भाव यामुळं शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच या परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगळा पर्याय निवडला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 21, 2023, 01:53 PM IST
सतत अवकाळीचे संकट; नाशिकच्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी निवडला वेगळा पर्याय title=
due to unseasonal rain nashik farmers choose other option

Farmers News: अवकाळी पाऊस, बदलते हवामान यामुळं शेतकरी चिंतेत आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नाशिकमध्ये प्रामुख्याने द्राक्षे आणि कांद्याचे पिक अधिक घेतले जाते. मात्र, सततच्या झालेल्या अवकाळी पावसामुळं द्राक्षाची बाग उद्ध्वस्त झाली आहे. तर, कांदादेखील सडून गेला आहे. पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. पण काही नाशिकमधील काही शेतकऱ्यांनी या अडचणीवर मार्ग काढत शेतीसाठी दुसरा पर्याय शोधला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत नवीन पर्याय अवलंबला आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा रब्बीची पेरणी 47 टक्के कमी झाली आहे. मात्र, यामध्ये प्रामुख्याने ज्वारीची पेरणी अधिक झाली आहे. त्यामुळं यंदा नाशिक जिल्ह्यात ज्वारीचे बंपर पिक येणार असल्याची शक्यता निर्माण होत आहे. कांदा, द्राक्षे यापेक्षा ज्वारीला अधिक चांगला भाव मिळत असल्याने तसंच, कमी खर्चाचे उत्पन्न असल्याने नाशिक जिल्ह्यातल्या पू्वपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात या पिकाला पसंती मिळत आहे. तसंच, कांदा आणि द्राक्ष्याऐवजी शेतकऱ्यांनी मका या पिकाचाही पर्याय वापरला आहे. नाशिकमध्ये मक्याचे पिकही मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. 

दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील बागायती शेती हळूहळू अडचणीत आल्याचा दिसून येते आहे. नुकसान टाळण्यासाठी शेतकरी पारंपारिक शेतीसोडून आधुनिक शेतीचा पर्याय वापरत आहेत. त्यामुळं कमी खर्चात जास्त उत्पन्न तर मिळतेच आणि शेतीला नवीन पर्यायदेखील उपलब्ध होत आहे. 

नंदूरबार जिल्ह्यात कांदा लागवड

नंदूरबार जिल्ह्यात हिवाळी कांदा लागवडीला वेग आला आहे. जिल्ह्यातील पूर्व पट्यात कांद्याचा क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. कांदा लागवडीच्या काळात दिवसा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात कांदा लागवड करण्यात येत असते, या वर्षी नंदुरबार जिल्ह्यात रब्बी कांद्याचे क्षेत्र वाढणार असून शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. या कांद्याचे उत्पादन रब्बी हंगामाच्या शेवटी येत असते. त्यामुळे बाजार भाव मिळत असतो. जिल्ह्यात सध्या कांदा लागवडीची लगबग दिसून येत आहे. रब्बी कांदा लागवडीतून मोठ्या प्रमाणात मजुरांना रोजगार मिळत आहे. कांदा लागवडीचा हंगाम सुरु असून, विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करावा अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.