मुंबई : पालघर जिल्ह्यातील चिंचणी बीचवर आलेल्या पर्यटकांकडून कारवाई करणाऱ्या पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाचा काळ असल्यामुळे अनेक निर्बंध लावण्यात येत आहे. असं असतानाही पर्यटक अगदी मोकळेपणाने फिरताना दिसत आहेत. (Drunk tourist beaten Policemen at Palghar) पालघरमधील या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पर्यटन स्थळांवर बंदी असल्याने कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला . तसेच मद्य प्राशन करून धिंगाणा ही केल्याची घटना घडली आहे . या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात तीन पर्यटकां विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पर्यटन स्थळांवर बंदी असताना देखील पालघर मध्ये मुंबई ठाणे या भागातील पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
अहमदनगरमधील प्रसिद्ध असलेल्या भंडारदरा धरण परिसरातही अशाच प्रकारे शनिवारी एकच मोठी गर्दी केली होती. यावेळी मद्यधुंद पर्यंटकांनी चक्क पोलिसांवरच हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी भंडारदरा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली होती. यावेळी धरणात एक पर्यटक बुडाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले.
धरण परिसरात बुडालेल्या पर्यटकांचा पोलिसांनी शोध घेतला मात्र, त्या पर्यटकाबाबत काहीच माहिती मिळाली नाही. यावेळी तेथील मद्यधुंद असलेल्या पर्यटकांनी पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी स्थानिक दुकानदारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता पर्यटकांनी त्या दुकानदारालाच मारहाण केली. मग पोलिसांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न करताच दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी पोलिसांनाच अरेरावी करत त्यांच्यावर हात उचलला.