बसचालकाने बसमध्येच संपवला आपला जीवनप्रवास, मृत्यूनंतरही प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड

एसटीच्या घंटी वाजवण्याच्या दोरीने बस चालकाने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. बस आगारामध्येच घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

Updated: Aug 7, 2022, 09:51 PM IST
बसचालकाने बसमध्येच संपवला आपला जीवनप्रवास, मृत्यूनंतरही प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया धुळे : एसटीच्या घंटी वाजवण्याच्या दोरीने बस चालकाने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. बस आगारामध्येच घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र आत्महत्येनंतर एसटी कर्मचाऱ्याच्या मृतदेहाची हेळसांड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

हिरामण देवरे असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. हिरामण हे पुण्यातील शिवाजीनगर आगारात कार्यरत होते. शनिवारी पुण्याहून ते एसटी घेऊन धुळ्याला आले होते. त्यावेळी त्यांनी आगारमधील बसमध्येच घंटीच्या दोरीने फास घेत आपली जीवनयात्रा संपवली. देवरे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. धुळे पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

रुग्णवाहिका बोलून देवरे यांचा मृतदेह रुग्णालयात नेणं अपेक्षित होते, मात्र तसं न करता, धुळे आगार प्रशासनाने आणि पोलिसांनी त्यांचा मृतदेह एका एसटी बसमध्ये पुढील वैद्यकीय तपासणीसाठी नेला. काही कर्मचाऱ्यांनीही दबव्या आवाजात याबाबत नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, काही वेळ थांबून रुग्णवाहिकेत देवरे यांचा मृतदेह नेला असता तर त्याची अशी अवहेलना झाली नसती. प्रशासनाने सबुरीने घेत देवरे यांच्या मृतदेहाला सन्मान देऊन तो व्यवस्थित रुग्णालयात तपासणीसाठी पाठवणं आवश्यक होतं, मात्र तसं झालं नाही.