मुंबई : पालघरजवळ डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा हस्तगत केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ५० कोटी असल्याचं सांगितलं जातं आहे. पकडण्यात आलेल्या या ड्रगला आंतराष्ट्रीय बाजारात फायटर ड्रग असंही संबोधलं जातं. विशेष म्हणजे दहशतवादीही या ड्रगचं सेवन ट्रेनिंगच्या वेळी करतात असा संशय आहे.
डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स म्हणजेच डीआरआयने मुंबईजवळ पालघरमध्ये एका औषध कंपनीवर छापा टाकला. या छाप्यात फायटर नावाचा अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला. ट्रामडोल नावाची ही टॅबलेट आहे. पेन किलर म्हणून या टॅबलेटचं सेवन केलं जातं. मात्र पेन किलर या उद्देशाऐवजी अंमली पदार्थ म्हणून याचा वापर जगभरात केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात फायटर ड्रग नावाने हे ड्रग ओळखलं जातं. तज्ज्ञांच्या मते हे ड्रग दहशतवादी संघटना मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. आयसीससारख्या संघटनाही ट्रेनिंगच्या दरम्यान हे ड्रग तरूणांना देत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे जखमा झाल्यावर वेदना कमी होतातच पण ड्रगच्या सेवनामुळे एक्स्ट्रा एनर्जीही मिळते.
या गोळीचं सेवन केल्यावर लगेच ही गोळी आपला परिणाम दाखवायला सुरूवात करते. सेवन करणाऱ्याला आपण योद्धा असल्यासारखं वाटायला लागतं. मात्र या गोळीचा उलटा परिणाम म्हणजे ही गोळी योग्य मात्रेत घेतली नाही तर गोळी घेण्याची सवय लागायला लागते. हळूहळू सेवन करणाऱ्याच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला होतो. छोट्या छोट्या जखमाही प्रचंड वेदनादायी होऊ लागतात. त्यामुळे सतत ही गोळी घेण्याची सवय लागते. सतत ही गोळी घेतल्यामुळे सेवन करणाऱ्याचं शरीर खंगायला लागतं आणि त्यात त्याचा अंतही होऊ शकतो.
ट्रामडोल टॅबलेटवर अनेक देशात बंदी आहे. भारतातही या ड्रगवर नुकतीच बंदी घालण्यात आलीय. या गोळीच्या उत्पादनासाठी कोणत्याही परवानग्या नव्हत्या. तरीही पालघरमध्ये कारखाना सुरू होता. डीआरआयच्या छाप्यात या गोळ्यांचे तब्बल ९५० बॉक्स पकडण्यात आलेत. डीआरआयने एकूण ३ जणांना अटकही केलीय. या गोळ्यांचे ग्राहक कोण होते याचा शोध आता घेतला जातोय. भारतातले तरूण, अंडरवर्ल्ड कोणापर्यंत या गोळ्या जात होत्या याचा शोध घेतला जात आहे.