CCTV! कायद्याचा धाक उरला आहे का? भरदिवसा दुकानात घुसून ज्वेलर्स मालकावर चाकूने हल्ला

डोंबिवलीतील धक्कादायक घटनेने खळबळ, हल्लेकोर पसार, घटना CCTV त कैद

Updated: May 18, 2022, 03:14 PM IST
CCTV! कायद्याचा धाक उरला आहे का? भरदिवसा दुकानात घुसून ज्वेलर्स मालकावर चाकूने हल्ला title=

आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण :  राज्यात गुंडांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. डोंबिवलीत एका हल्लेखोराने भरदिवसा ज्लेलर्सच्या दुकानात घुसून ज्वेलर्स मालकावर चाकूने हल्ला केला. हल्लाचा हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

या हल्ल्यात ज्वेलर्स मालक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हल्लेखोर पसार झाला आहे  याप्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत फरार हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे .

दरम्यान पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय वर्तविण्यात येत असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. मात्र पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.

डोंबिवलीतील आगरकर रोडवर मन्ना तारकनाथ यांचे मन्ना ज्वेलर्स नावाने दुकान आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास मन्ना आपल्या दुकानात होते. याच दरम्यान एक अज्ञात इसम दुकानात आला या इसमाने चेहरा झाकलेला होता.  त्याने मन्ना यांना चाकूचा धाक दाखवला. घाबरलेल्या मन्ना यांनी प्रतिकार केला असता त्याने चाकूने मन्ना यांच्यावर हल्ला केला.

हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे .या हल्ल्यात मन्ना यांना दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरा  विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.