चिमुरड्या नंदिनीचा मृत्यू : दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची गावकऱ्यांची मागणी

नंदिनीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आलीय

Updated: May 10, 2019, 09:16 AM IST
चिमुरड्या नंदिनीचा मृत्यू : दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची गावकऱ्यांची मागणी  title=

प्रशांत परदेशी, झी २४ तास, धुळे : तीव्र पाणी टंचाईमुळे धुळे जिल्ह्यातील मोरदड तांडा येथील नंदिनी नथु पवार या अवघ्या १३ वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. विहिरीतून पाणी काढताना या चिमुरडीचा पाय घसरला आणि विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोरदड तांडा या गावात प्रचंड रोष निर्माण झालाय. नंदिनीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी तसंच मागणी करुनही टँकरची संख्या न वाढवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी इथल्या गावकऱ्यांनी केली आहे. 

धुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईचा नंदिनी पहिला बळी ठरलीय. धुळे तालुक्यातील मोरदड तांडा इथं नंदिनी गावाजवळ असलेल्या एका खासगी विहिरीवर पाणी भरायला गेली होती. पाणी भरतानाच तिचा पाय घसरला आणि ती चाळीस फुटांहून अधिक खोल विहिरीत जाऊन पडली. नंदिनीचा विहिरीत पडल्याबरोबर जागीच मृत्यू झाला.

नंदिनी ही अत्यंत हुशार मुलगी होती. ती यंदा सातवी इयत्तेत जाणार होती. मात्र अशा या हुन्नरी विद्यार्थिनीचा पाणी टंचाईनं जीव घेतल्यानं गावात हळहळ व्यक्त होतेय. नंदिनीच्या कुटुंबीयांना आर्थिक मिळावी, अशी अपेक्षाही गावकऱ्यांनी व्यक्त केलीय.

 

मोरदड तांडा या गावाची लोकसंख्या जवळपास २२०० च्या घरांत आहे. या गावाला तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून भेडसावतोय. प्रशासनाला वारंवार सांगूनही फक्त दोन टॅंकरच्या फेऱ्यांनी पाणीपुरवठा केला जातो. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सतत या भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने भीषण पाणी टंचाई आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली गेल्यामुळे नंदिनीला आपला जीव गमवावा लागल्याची प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळेच हलगर्जीपणा करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय.