तुषार तपासे, झी 24 तास, वाई: साताऱ्यातील वाई तालुक्यातील ओझर्डे येथे रात्री 3 वाजता मोठी घटना घडली आहे. ओझर्डे गावातील ओढ्यामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे. यानंतर जवळपास दीडशे ऊस तोड कामगारांना पुरातून बाहेर काढण्यात यश आले आहे. तूर्त या घटनेत जिवित हानी समोर आली नाही. तरीही अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. पूराच्या पाण्यात दोन बैल वाहून गेल्याचेही वृत्त आहे.
धोम डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडल्याने या गावातील ओढ्याला मोठा पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात अनेक ऊस तोड कामगार अडकले होते. मात्र त्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
असे असले तरी या ऊस तोड कामगारांचे सर्व साहित्य ,अन्नधान्य,पैसे आणि काही बैलगाड्या ,2 बैल वाहून गेले आहेत.या ऊस तोड कामगारांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
या घटनेच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन पोहचले असून या दीडशेच्या वर कामगारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.