सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळातल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात अखेर यश आलं. 12 जणांचा बळी घेणारा बिबट्या अखेर ठार झाला. करमाळ्यातील वांगी नंबर चार या गावात बिबट्या मारला गेला. अकलूजच्या धवलसिंह मोहिते पाटील यांनी झाडलेल्या गोळीत बिबट्या ठार झाला.
जर्मन कंपनीची डबल बार आणि 12 बोरच्या रायफलने बिबट्याला मारलं. धवलसिंह यांना ही रायफल त्यांचे वडील माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी भेट दिली होती. गेले कित्येक दिवस बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न होत होता. काही पिंजरेही ठिकठिकाणी लावण्यात आले होते.
वनविभागचे पथक त्याच्या मागावर होतं. मात्र बिबट्या सतत हुलकावणी देत होता. अनेक लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी जाऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. बिबट्या मारला गेल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकलाय.