ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातील कानेगावात (Kanegaon) एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गावातील दलित बाधवांमध्ये गावकऱ्यांविरोधात संतापाची लाट पसरली आहे. गेल्या पाच वर्षांपासून कानेगावातल्या गावकऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती (Dr Babasaheb Ambedkar Jayanti) साजरी करू दिली नाही असा या दलित बांधवांचा आरोप आहे. सततच्या जातीय छळाला कंटाळून अखेर 100 पेक्षा जास्त दलित कुटुंबांनी कानेगावाला जय भीम करत गाव सोडण्याचा निर्णय घेतला.
दलित समाज आक्रमक
गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी तसंच गावातील समाज मंदिर (Samaj Mandir) खुलं करावं या मागणीचं निवेदन गावातील दलित समाजाने याआधीही जिल्हाधिकारी यांना दिलं होतं. पण यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे गावकरी आक्रमक झाले आणि त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत कानेगाव मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही तोपर्यंत कानेगावत न परतण्याचा त्यांनी निर्धार केला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन
50 किलोमीटर अंतर पायी चालत धाराशिवच्या (Dharashiv) जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या दलित बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला. त्यानंतर यंत्रणांची धावाधाव सुरू झाली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कानेगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला विरोध करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला.
समाज मंदिरावरुन वाद
2017 मध्ये कानेगावमध्ये समाज मंदिरावरून दलित आणि सवर्ण असा वाद झाला होता. या प्रकरणात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी या गावांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला प्रशासनाच्या वतीने परवानगी नाकारण्यात आली होती.
अखेर तोडगा निघाला
झी 24 तासनं ही बातमी दाखवल्यानंतर कानेगावमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला परवानगी नाकारल्याचे प्रकरण अखेर मिटलं. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत तोडगा निघाला. कानेगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला परवानगी देण्यात आली आहे तसंच दलित समाजासाठी समाज मंदिरासाठी स्वतंत्र जागा देण्याचं प्रशासनाने मान्य केला आहे. प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून कानेगावमधील दलित बौद्ध ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.
ज्या महामानवानं देशाला संविधान दिलं, दिशा दिली. त्यांच्याच जयंतीला विरोध करून जातीय छळ करण्याचे प्रकार आजही सुरू असणं समाजाला आणि पुरोगामी महाराष्ट्रालाही मोठा कलंक आहे. जातीचा जाच करणाऱ्या अशा विकृतांवर कडक कारवाई व्हायलाच हवी.