चिंताजनक! राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला बळी

डेल्टा प्लस व्हायरसचा अख्ख्या जगालाच धोका आहे.

Updated: Jun 25, 2021, 02:23 PM IST
चिंताजनक! राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला बळी title=

मुंबई : भारतात सापडलेल्या कोरोना डेल्टा प्लस व्हायरसचा अख्ख्या जगालाच धोका आहे. या धोकादायक व्हेरियंटने राज्यात शिरकाव केला आहे.  तर आता डेल्टा प्लसचा पहिला बळी गेला आहे. त्यामुळे आता राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंबाबत अधिकंच चिंता व्यक्त करण्यात येतंय.

राज्यातील रत्नागिरीमध्ये एका 80 वर्षीय आजीचा मृत्यू झाला आहे. 13 जून रोजी या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर स्वॅब टेस्ट केली असता त्यांचा मृत्यू कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटने झाला असल्याचं समोर आलं आहे. 

काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण सापडले असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी राज्यात 21 रूग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली होती. 

तर यापूर्वी मध्यप्रदेशातील उज्जैन येथे एका महिलेचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. आता पर्यंत देशात 40 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. अमेरिका आणि ब्रिटेन मध्ये डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत.

दुसरीकडे डेल्टा प्लस व्हायरसवर कोरोनावरची औषधं आणि लसही प्रभावी ठरण्यावर शंका निर्माण केली जातेय. डेल्टा प्लस त्याच्यामधल्या स्पाईक प्रोटीनच्या मदतीने पेशींवर आक्रमण करतो. आणि हा व्हायरस रोगप्रतिकारकशक्तीवर जबरदस्त हल्ला करतो. त्यामुळेच कोरोनावरची लस डेल्टावर परिणामकारक ठरण्याबद्दल साशंकता आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटवर अँटिबॉडी कॉकटेलचाही परिणाम होत नाहीये.

डेल्टा व्हेरियंट सगळ्यात आधी भारतात ऑक्टोबर महिन्यात सापडला होता. भारतात दुस-या लाटेचा कहर डेल्टा व्हेरियंटमुळेच झाल्याचा अंदाज आहे.