औरंगाबाद : दुष्काळग्रस्त मराठवाड्याला कृत्रिम पावसाच्या नावाखाली राज्य सरकारने फसवले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या शुक्रवारपासून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग राज्य शासनाने हाती घेतला. मात्र, तो प्रयोग नसून ती फक्त चाचणी असल्याचे समोर आले आहे. सोलापूरमध्ये असलेले आयआयटीएम म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे विमान उसने आणून ही 'चाचणी' घेण्यात आली. त्यात गेली चार दिवस पाऊसच पडला नसल्याने तेही विमान माघारी परतले आहे.
कृत्रिम पाऊस पाडणारे विमान अद्याप सौदी अरेबियात आहे. आता या प्रयोगासाठीचं विमान १७ ऑगस्टला दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य शासनाने ज्या केसीएमसी कंपनीला कंत्राट दिले आहे, त्या कंपनीचे विमान १७ ऑगस्टला येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते विमान सध्या सौदी अरेबियात आहे. त्यानंतर ते अहमदाबादला येईल. त्याठिकाणी कस्टमची पूर्तता पूर्ण झाल्यानंतर औरंगाबादमध्ये दाखल होईल. त्यानंतर कृत्रिम पावसाच्या खऱ्या प्रयोगाला सुरुवात होईल.
धक्कादायक म्हणजे ८ ऑगस्ट रोजी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन सर्व परवानग्या, कस्टमचे विषय संपले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. या सगळ्या खटाटोपानंतर कृत्रिम पावसाची चाचणीच झाल्याचे उघड झाले आहे. राज्य शासनाकडून कृत्रिम पावसाची तारीख पाळण्यासाठी ही चाचणी दाखवून दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.