मालेगावानंतर पंढरपुरातही आई-वडिलांकडूनच मुलीची क्रूर हत्या

मुलीची हत्या करून शेतातच तिचा मृतदेह पेटवून दिला

शुभांगी पालवे | Updated: Oct 7, 2018, 11:26 AM IST
मालेगावानंतर पंढरपुरातही आई-वडिलांकडूनच मुलीची क्रूर हत्या title=
आरोपी विठ्ठल बिराजदार

पंढरपूर : मालेगावानंतर आता पंढरपुरातही आई-वडिलांनीच आपल्या पोटच्या गोळ्याला ठार मारल्याची घटना उघडकीस आलीय. आपल्या मुलीचे शेतातील सालगड्याच्या मुलाशी प्रेमसंबंध आहेत आणि त्यांनी दोघांनी प्रेमविवाह केलाय हे समजल्यानंतर आई-वडिलांनीच आपल्या मुलीची हत्या करून शेतातच तिचा मृतदेह पेटवून दिल्याची घटना घडलीय. मंगळवेढा तालुक्यातील सलगरमध्ये ही क्रूर आणि निंदनीय घटना घडलीय. 

अनुराधा बिराजदार ही बीएएमएसचं शिक्षण घेत होती. या दरम्यान तिचे शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगाराच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले.

परंतु, अनुराधाची सावत्र आई श्रीदेवी आणि वडील विठ्ठल बिराजदार यांना मात्र हे रुचलं नाही. 

अधिक वाचा : ...म्हणून वाढदिवशी आई-बाबांकडूनच गळा दाबून मुलीची हत्या 

समाजातील बदनामीच्या खोट्या भीतीनं श्रीदेवी आणि विठ्ठल बिराजदार यांनी ५ ऑक्टोबरच्या पहाटे आपल्या मुलीची हत्या केली. कुणाला समजण्याच्या आत तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. 

या घटनेची कुणकुण लागताच ५ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पोलिसांनी श्रीदेवी आणि विठ्ठल यांना अटक केली. 

मालेगावची पुनरावृत्ती...

काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये झालेल्या नेहा चौधरी हिची हत्याही तिच्या आई वडिलांनीच चुलत भावाच्या मदतीनं केल्याचं उघड झालं होतं.

नेहाचे प्रेमसंबंध न रुचल्यानं नेहाची तिच्या वाढदिवशीच गळा दाबून हत्या करण्यात आली होती.

यानंतर नेहाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी चितेवर ठेवला असतानाच पोलिसांनी अचानक धडक देत मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला.

एक निनावी फोन कॉलवरून पोलिसांना नेहाच्या संशयास्पद मृत्यूची माहिती मिळाली होती.